|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कृष्ण गोकुळीं जन्मला

कृष्ण गोकुळीं जन्मला 

भगवंताने अवनीवर मथुरेत जन्म घेतला आहे हे केवळ वसुदेव देवकीला माहीत होते. आता यशोदेला पुत्र झाल्याची वार्ता सगळय़ा गोकुळात पसरली. त्या सर्वांच्या दृष्टीने भगवंताचा जन्म मथुरेत नव्हे, तर गोकुळातच झाला होता. त्यामुळेच तुकाराम महाराज वर्णन करतात –

कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला

होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर

सदा नाम वाचे गातीं । प्रेमे आनंदे नाचती ।

तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ।।

संत जनाबाई या लगबगीचे गोड वर्णन करतात ते असे-गौळण सांगे गौळणीला । पुत्र जाहला यशोदेला ।।

एक धांवे एकीपुढें । ताटीं वाटीं सुंठवडे ।।वाण भरोनिया ताटीं । यशोदेच्या घरिं दाटी ।। सुईणीची गलबल झाली । दासी जनी हेल घाली ।।

सुईण मनात म्हणू लागली-ही काय गडबड? काल रात्री यशोदेचे बाळंतपण केले तेव्हा तर तिला मुलगी झाली होती. याच हातानी तर बाळंतपण केले. पण बाळंतपणाच्या श्रमामुळे यशोदेला ग्लानी आली होती. नंतर लगेच ती गाढ झोपी गेली, म्हणून मी काही बोलले नाही. आता तर गौळणी सांगताहेत की यशोदेला मुलगा झाला. ती धावतच यशोदेपाशी आली. यशोदेच्या कुशीतील त्या दिव्य मुलाचे मुख पाहिले मात्र आणि तिला समाधीच लागली. शुद्धीवर आली तेव्हा तीच म्हणू लागली-अशी कशी मी खुळी! आता म्हातारपणी मला नीट काही दिसत नाही आणि नीट काही कळत नाही हेच खरं! यशोदेला मुलगी नाही मुलगा झाला हेच खरं!

नामदेवराय वर्णन करतात –

विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र । म्हणवितो पुत्र नंदजीचा ।तीर्थें ज्याच्या चरणीं करीतातीं न्हाणीं ।  यशोदा जननी म्हणताती। वेडावला शेष शिणले वेद चारी । निजे मांडीवरी यशोदेच्या । शरणागता देत क्षीरसिंधु जाण । चोखीतसे स्तन आवडीनें ।त्रैलोक्मयाचा राजा वर्णू । काय रंक । ऐकावें जातक नामा म्हणे।

किती सुंदर वर्णन नामदेवरायांनी केले आहे पाहा-जो विश्वाचा निर्माता व सूत्रधार आहे, तो स्वतःला नंदाचा पुत्र म्हणवून घेतो. तीर्थे ज्याच्या चरणांपाशी येऊन स्नान करतात तो यशोदेला आपली आई म्हणतो. ज्याचे वर्णन करता करता वेद थकून गेले, आणि शेषही वेडावला, अपुरा पडला, तो यशोदेच्या मांडीवर झोपत आहे. शरणागत उपमन्यूला ज्याने दुधाच्या सागराचे दान दिले तो भगवान आवडीने यशोदामाईचे स्तनपान करीत आहे. अशा त्रैलोक्मयाच्या स्वामीचे माझ्यासारख्या रंकाने काय वर्णन करावे? तुम्ही अशा कृष्णाचा भविष्यकाळ ऐका असे नामदेवराय म्हणतात.

नंदे करुनियां स्नान । वस्रे घेतलीं नूतन ।पाचारा ब्राह्मण। श्रृंगारावें देवसदन ।बाहा बाहा दशग्रंथी । त्यासी सांगां आणा पोथी ।त्वरें बाहारे ज्योतिषी । नंद करी जातकासी ।केलें देवतार्चन । द्विज सांगती तर्पण।

फार त्याला सुख । पाहे कृष्णाजीचें मुख

करी पुण्याहवाचनें । नामा म्हणे आनंदानें ।

– ऍड. देवदत्त परुळेकर