|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » डेव्हिड मलानचे पहिले कसोटी शतक

डेव्हिड मलानचे पहिले कसोटी शतक 

वृत्तसंस्था /पर्थ :

डेव्हिड मलानने झळकवलेले पहिले कसोटी शतक, जॉनी बेअरस्टो व स्टोनमन यांची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने ऍशेस मालिकेतील तिसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 बाद 305 धावा जमवित वर्चस्व राखले.

यजमान ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या दोन कसोटी जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असून इंग्लंडला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कामगिरी उंचावण्याची गरज होती आणि त्यात या कसोटीच्या पहिल्या दिवशी तरी त्यांनी यश मिळविले आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. वाकाच्या उसळत्या खेळपट्टीवर सुरुवात खराब झाली असली तरी मलानचे नाबाद शतक आणि स्टोनमन, बेअरस्टो यांच्या अर्धशतकांमुळे त्यांची स्थिती बऱयापैकी सुधारली आणि ऍशेस बचाव मोहिमेच्या त्यांच्या आशाही बळावल्या आहेत. 4 बाद 131 अशा स्थितीनंतर मलानने बेअरस्टोच्या साथीने डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 174 धावांची भागीदारी केली. दिवसअखेर बेअरस्टो 75 (149 चेंडूत 10 चौकार) व मलान 110 (174 चेंडूत 15 चौकार, 1 षटकार) धावांवर खेळत होते. या मालिकेतील इंग्लंडतर्फे नोंदवलेली ही सर्वोत्तम भागीदारी आहे.

मलानचे पहिले शतक

इंग्लंडचा सलामीवीर मार्क स्टोनमनला वादग्रस्तरीत्या बाद देण्यात आले. यातूनही ते सावरले आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण करून त्यांना ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनीही मदत केली. त्यांनी तीन झेल सोडले आणि एक धावचीतची संधी वाया घालविली. 30 वर्षीय मलाननेही जीवदानाचा लाभ घेत आठव्या कसोटीत पहिले शतक नोंदवले. या मालिकेतील इंग्लंडतर्फे नोंदवलेले हे पहिलेच शतक आहे. 32 धावांवर असताना वॉर्नरच्या थेट फेकीवर तो धावचीत झाला असता. त्यानंतर 92 धावांवर असताना कॅमेरॉन बॅन्क्रॉफ्ट स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला. शतकाजवळ असताना संयम राखत हॅझलवुडला पुलचा फटका मारत ते पूर्ण केले. 159 चेंडूत 13 चौकार व एका षटकाराच्या मदतीने त्याने हे शतक पूर्ण केले. स्टार्क, हॅझलवुड, कमिन्स यांच्या भेदक उसळत्या माऱयासमोर इंग्लंड दडपणाखाली असताना तो मैदानात उतरला होता. सुरुवातीला उसळत्या चेंडूवर फटके मारताना तोही बचावला होता. पण स्थिरावल्यानंतर त्याने सफाईदार प्रदर्शन केले. त्याला बेअरस्टोकडून चांगली साथ मिळाली.

स्टोनमन वादग्रस्तरीत्या बाद

ताशी 90 मैलहून अधिक वेगाने आक्रमक मारा करणाऱया ऑस्टेलियन गोलंदाजांमुळे इंग्लंडच्या फलंदाजांवर थोडीशी दहशत बसली होती. त्यात स्टोनमनला 52 धावांवर असताना दोन जीवदाने मिळाली आणि याच धावसंख्येवर असताना त्याच्या हेल्मेटला वेगवान चेंडूचा जबरदस्त तडाखा बसला. या सर्वांवर मात करीत स्टोनमन फलंदाजी करीत असताना एका वादग्रस्त निर्णयावर तो 56 धावांवर बाद झाला. तिसरे पंच अलीम दार यांनी स्टार्कच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाल्याचा निर्णय दिला. स्टार्कचा उसळता चेंडू ‘फेंड’ करताना त्याच्या ग्लोव्हला लागून यष्टिरक्षकाकडे गेला. त्याने एकहाती अप्रतिम झेल टिपून अपील केले. पण मैदानी पंच मरायस इरासमुस यांनी अपील फेटाळून त्याला नाबाद ठरविले. त्यावर ऑस्ट्रेलियाने डीआरएसची मागणी केली आणि रिप्लेमध्येही स्पष्ट असे काहीच दिसत नव्हते. तरीही पंच दार यांनी इरासमुस यांचा निर्णय फिरवित स्टोनमनला बाद दिले. स्टोनमनने 110 चेंडूत 10 चौकारांसह 56 धावा केल्या.

Related posts: