|Thursday, November 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » झाकीर विरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द

झाकीर विरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द 

धर्माच्या नावाखाली तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचे  काम

प्रतिनिधी/ मुंबई

इस्लाम धर्माच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना भडकावू भाषण देऊन चिथावणारा मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात इंटरपोलने जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस अखेर रद्द करण्यात आली आहे. याबाबत अधिक विचारविमर्श सुरू असल्याची माहिती तपासयंत्रणातील अधिकाऱयांनी दिली.

  झाकीरवर दहशतवाद्यांना निधी पुरविणे तसेच हवालामार्फत पैसा कमावल्याचा आरोप असल्याने तो सौदीत फरार झाला. मात्र, सौदीत देखील आपल्याविरोधात फास आवळला जाऊ शकतो याची कल्पना येताच झाकीरने मलेशियाला पलायन केले होते. मलेशिया सरकारवर अनेक मार्गांनी दबाव येण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी भारत सरकारने झाकीरच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्यानंतर त्याला भारताच्या हवाली करण्यात येईल, असे मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद जाहीद हमिदी यांनी सभागफहात स्पष्ट केले होते. तसेच झाकीरने मलेशियातील कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याने त्याचा पासपोर्ट अवैध ठरवता येणार नसल्याचे मलेशिया सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर झाकीरचा पासपोर्ट अवैध ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर झाकीरने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकविण्यासह इतर आर्थिक गुह्यांसाठी भारतातील तपासयंत्रणांना झाकीर हवा होता. सौदी नंतर पाच वर्षे मलेशियात राहत असलेल्या झाकीरने आपले बस्तान बसविले आहे. पंतप्रधानांसह बडय़ा मंडळींसोबत ऊठबस असलेला झाकीर स्वत:हून भारतात परतण्याची किंवा त्याला पाठविले जाण्याची शक्यता नाही. ब्रिटन आणि बांगलादेशने प्रवेशबंदी घातलेल्या झाकीरला मलेशियाने आसरा दिल्याने या बहुधर्मी देशात कट्टर इस्लामी विचारांचा पगडा वाढत असल्याचे समोर आले होते. झाकीरने भारतातील न्यायालयाने काढलेल्या समन्सना प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, अन्य माध्यमांतून आरोपांचे खंडन केले आहे. त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेमार्फत त्याने धर्मपरिवर्तन तसेच तरुणांची माथी भडकविण्याचे काम सुरू केल्याने या संस्थेवर एनआयएने धाडसत्र टाकीत टाळे ठोकले होते.

तसेच त्याच्या घर आणि कार्यालयावर छापेमार करीत 40 कोटी रुपयांसह अनेक कागदपत्रे जप्त केली होती. त्यामुळे झाकीरचा ताबा तपासयंत्रणांना हवा होता. मात्र, झाकीरकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच इंटरपोलने त्याच्या विरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द केल्याने तपासयंत्रणांना धक्का बसला आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे तपास यंत्रणातील अधिकाऱयाने सांगितले.

Related posts: