|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दुचाकी-चारचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार

दुचाकी-चारचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

 भरधाव वेगाने धावणाऱया मारूती सुझुकी रिट्झ या चारचाकी गाडीने मोटारसायकला धडक दिल्याने दोनजण ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोणजवळ घडली. मृतात बारा वर्षाच्या मुलाचा समावेश असून दोन्ही मृत व जखमी कुपवाड जवळील बामनोलीचे रहिवासी होते. रविवारी दुपारी एकच्या दरम्यान हा अपघात झाला.

 कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे जिल्हा क्रीडा असोसिएशने क्राँसकंट्री स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धा होत्या. या स्पर्धेसाठी सुमंत तारकेश्वर राजबर (14), राहुल बाळू कांबळे (22), रामजीत यादव (12) हे एम.एच. 9 सी. एफ. 3008 या मोटारसायकलीवरून गेले होते. कांबळे आणि यादव हे निवड चाचणीची स्पर्धा बघायला गेले होते आणि चौदा वर्षाचा सुमंत हा निवड चाचणीसाठी गेला होता. निवड चाचणीची स्पर्धा आटोपून बामनोलीकडे निघाले असता त्यांच्या मोटारसायकला टी. एस. 9-व्ही. बी. 2606 या मारूती सुझुकी रिट्झने शिरढोणजवळील जुन्या विठ्ठल कामत हॉटेलजवळ जोराची धडक दिल्याने राहुल बाळू कांबळे (22) हा तरूण जागीच ठार झाला तर रामजीत यादव रा. बामनोली (12) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना तो मरण पावला व सुमंत तारकेश्वर राजबर (14) हा जखमी झाला असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

 बामनोली येथील बामनोली स्पोर्टस् क्लबचे राजबर हा खेळाडू असून नागज येथून क्राँसकंट्री स्पर्धेची निवड चाचणी आटोपून राहुल कांबळे, रामजीत यादव व सुमंत राजबर हे जेवण्यासाठी हॉटेलकडे जात होते. मागून कोल्हापूरकडे जाणाऱया मारूती सुझुकी रिट्झ या चारचाकीने धडक दिल्याने जेवण करण्यापूर्वीच राहुल कांबळे व रामजीत यादव यांच्यावर काळाने झडप घातली. हा अपघात एवढा मोठा होता की, चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे जवळच असलेल्या लांडगेवाडीतील नागरिकांनी तसेच रस्त्यावरून येणाऱया-जाणाऱयांनी धाव घेतली. मयत राहुल कांबळे गाडीखाली सापडला होता व रामजीत यादवही त्याच्या शेजारीच पडल्याचे नागरिकांनी पाहिले व त्यांना गाडीखालून काढून यादवला लगेचच उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बारा वर्षाचा हा मुलगा मरण पावला तसेच सुमंतही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

 शिरढोणजवळ झालेल्या दुचाकी व चारचाकी यांच्यातील अपघातात मोटार सायकलचा चक्काचूर झाला आहे तर चारचाकीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातस्थळी मृतातील तरूणांचा रक्तस्राव झाल्याने रस्त्याच्या कडेला पडलेले रक्त पाहून घटनास्थळी आलेल्या नागरिकांची मने हेलावून गेली. रात्री उशीरापर्यंत या अपघातप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Related posts: