|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजापूर तालुक्यात कडकडीत बंद

राजापूर तालुक्यात कडकडीत बंद 

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन

शेतकरी-मच्छीमार संघटनेने दिली होती बंदची हाक

शहरासह तालुक्यात सर्व दुकाने, बाजारपेठा बंद

 

वार्ताहर /राजापूर

राजापूर तालुक्यातील नाणार परीसरात होऊ घातलेल्या पेट्रोकेमीकल रिफायनरी प्रकल्पाविरोधात रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून राजापूर तालुक्यात गुरूवारी कडकडी बंद पाळण्यात आला. केवळ राजापूर शहर बाजारपेठच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवत प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले.

बाजारपेठेत पाहणी करताना आमदार राजन साळवी आणि सेना पदाधिकारी.

राजापूर तालुक्यातील नाणार व लगतच्या जवळपास 14 गावांमध्ये जगातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच प्रकल्पग्रस्त जनतेचा तीव्र विरोध आहे. आंदोलन, उपोषण निवेदन, आदी मार्गांनी प्रकल्पाला असलेला विरोध शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. प्रकल्पविरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या वतीने गुरूवार ‘राजापूर बंद’ची हाक दिली होती. राजापूर शहरातील व्यापाऱयांसह तालुक्यातील सर्व व्यापारी तसेच विविध संघटनांनी या बंदला पाठींबा जाहीर केला होता.

गुरूवारी राजापूर तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. राजापूर शहरात मेडीकल वगळता अन्य कोणतेही दुकान उघडे नव्हते. तसेच गुरूवारी भरणार आठवडा बाजारही बंद ठेवण्यात आला. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. ओणी, वाटूळ, पाचल, जैतापूर, नाटे, साखरीनाटे, आडीवरे, सागवे, सौंदळ, कोंडय़े, हातिवले यासह संपूर्ण तालुक्यातील लहान मोठय़ा बाजारपेठा बंद होत्या. साखीरनाटेतील अनेक मच्छीमारांनी बोटी किनाऱयावर लावून बंदमध्ये सहभाग घेतला. विविध रिक्षा संघटनांनीही बंदमध्ये सहभाग दर्शविला.

रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेला शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, महाराष्ट्र स्वाभीमान पक्ष या राजकीय पक्षांसह व्यापारी व अन्य संघटनांचा पाठींबा मिळाल्याने ‘राजापूर बंद’ शंभर टक्के यशस्वी झाला. बंदच्या पार्श्वभूमीवर राजापूर बाजारपेठेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान आमदार राजन साळवी यांनी जनतेला रिफायनरी प्रकल्पामुळे होणाऱया नुकसानीची जाणीव करून देत बंद पाळण्याचे आवाहन केले. गुरूवारी सकाळी आ.साळवी यांनी राजापूरात बंदची पाहणी केली. यावेळी रिफायनरी विरोधी शेतकरी मच्छिमार समिती अध्यक्ष कमलाकर कदम, मजिद भाटकर, ओंकार देसाई, सचिव भाई सामंत, संजय देसाई, गाव आणि मुंबई समन्वय समिती मच्छिमार संघटना सलमान सोलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजापूर पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, शिवसेना राजापूर शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, राजन कुवळेकर, शिवसेना विभाग प्रमुख नरेश दुधवडकर, संतोष हातणकर, युवासेनेचे प्रफुल्ल लांजेकर, भाजपचे महादेव गोठणकर यांचेसह सर्व पंचायत समिती सदस्य, राजापूर नगरपरिषद नगरसेवक आदी उपस्थित होते.

शासनाला निवेदन

गुरूवारी सायंकाळी रिफायनरी प्रकल्प रद्द करावा या मागणीचे निवेदन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी राजापूर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच आमदार हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष हनिफ काझी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नागरेकर यांच्यासह राजापूरातील व्यापारी व विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढाऱयांची दुकाने मात्र उघडी

गुरूवारच्या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी होती. आमदार राजन साळवी यांनी स्वतः बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार राजापूर बंदला शंभर टक्के यश मिळाल्याचा दावा शिवसेना नेते करत असले तरी त्यांच्या पक्षाच्या पुढाऱयांची दुकाने मात्र सुरू होती. माजी सेना नगरसेवक अशोक गुरव यांचे बसस्टँडनजीकचे वेल्डींग दुकान, शिवसेनेचे माजी सभापती हरिश्चंद्र गुरव यांचे सरस्वती हॉटेल व अन्य काही दुकाने दिवसभर सुरू होत़ी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related posts: