|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यातील डॉक्टरांचा आज ‘काळा दिवस’

राज्यातील डॉक्टरांचा आज ‘काळा दिवस’ 

प्रतिनिधी/फोंडा

लोकसभेमध्ये आज 2 जाने. रोजी चर्चेला येणाऱया नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला गोव्यातील डॉक्टर्सनी विरोध केला असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या झेंडय़ाखाली ‘काळा दिवस’ पाळून बंद पुकारला जाणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन हे वैद्यकीय क्षेत्रातील नितीमत्तेवर घाला घालणारे असल्याने देशभरातील डॉक्टर्स संघटनाचा या विधेयकाला विरोध असल्याची माहिती आयएमए गोवाचे अध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आयएमए गोवाचे सचिव डॉ. संदीप नाईक, खजिनदार डॉ. सर्वेश दुभाषी, पदाधिकारी डॉ. रेवा दुभाषी व डॉ. राजदत्त तिंबले हे उपस्थित होते. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया हे मंडळ कार्यरत असताना नॅशनल मेडिकल कमिशनची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे हे विधेयक चर्चेला येण्यापूर्वी एमसीआयच्या छाननी समितीसमोर चर्चेला येणे गरजेचे होते. वैद्यकीय क्षेत्रासाठी नव्याने लागू होणाऱया नॅशनल मेडिकल कमिशनवर डॉक्टरांपेक्षा बिगर वैद्यकीय क्षेत्रातील व राजकीय लोकांना प्रतिनिधीत्व असल्याने त्याला डॉक्टर्सचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी आयएमए दिल्लीच्या सूचनेनुसार गोव्यातील डॉक्टर्स आज मंगळवार 2 रोजी सकाळी 6 ते सायं. 6 वा. असा पूर्ण दिवस आपले दवाखाने बंद ठेवून विधेयकाचा निषेध करणार आहेत. डॉक्टर्सबरोबरच गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीही या निदर्शनामध्ये सहभागी होणार असल्याचे डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.

या विधेयकातील बरेच नियम व अटी वैद्यकीय पेशाच्या नितिमत्तेला धक्का लावणाऱया असून वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होणार आहे. देशभरातील केवळ पाच राज्ये या नवीन आयोगावर प्रतिनिधीत्व करणार असून इतर चोवीस राज्यांना संधी दिलेली नाही. विधेयकावरील तरतूदीनुसार विदेशी डॉक्टरही थेट भारतात येऊन वैद्यकीय पेशा सुरु करू शकतील. शिवाय वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचाराला वाव मोकळीक मिळणार आहे. हे  विधेयक लोकसभेत येण्यापूर्वी त्यावर डॉक्टर संघटनांची सविस्तर चर्चा होणे गरजेचे होते. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व प्रतिनिधींना अंधारात ठेऊन हे विधेयक मांडले जात आहे. त्यामुळे त्या विरोधात काळा दिवस पाळला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आझाद मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन

या विधेयकाला विरोध करण्यासाठी गोव्यातील सर्व डॉक्टर्सनी आज 2 जाने. रोजी सकाळी 10.30 वा. पणजी येथील आझाद मैदानावर जमा होण्याचे आवाहन डॉ. पेडणेकर यांनी केले आहे. यावेळी गोव्यातील डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज्यपाल व मुख्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांना हे विधेयक मागे घेण्यासंबंधी निवेदन सादर करणार आहेत.

Related posts: