|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » विविधा » आयुष्यातील अपयश साजरे करा ; अनुपम  खेर यांचा  सल्ला

आयुष्यातील अपयश साजरे करा ; अनुपम  खेर यांचा  सल्ला 

 पुणे / प्रतिनिधी :

बालपणातील अपयशाच्या प्रसंगात कुटुंबीयांनी कायम प्रोत्साहन देत माझे अपयश एका वेगळय़ा पद्धतीने साजरे केले. त्यामुळे माझ्या मनातील अपयशाची भीती जाऊन यशाचा मार्ग सुकर झाला. म्हणूनच आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असा सल्ला एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी शनिवारी येथे दिला.

रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 च्या वतीने आजपासून अध्याय 18 या विशेष परिषदेला हडपसर अमनोरा टाऊनशिप येथे सुरुवात झाली. त्यावेळी खेर बोलत होते. संस्थेचे अभय गाडगीळ, दीपा गाडगीळ आदी उपस्थित होत्या. खेर म्हणाले, लहानपणापासून मला अभिनय क्षेत्रात यायचे होते. मात्र, मी चांगला अभिनेता कधीच नव्हतो. शाळेच्या अनेक कार्यक्रमांमधून मी माझ्या अभिनयाचा छंद जोपासायचा प्रयत्न केला. पण, नेहमी त्यामध्ये अपयशीच होत राहिलो. घरचे काय म्हणतील याची भीती मनात नेहमी असायची. मात्र, घरातील सर्वांनीच माझ्या प्रयत्नांचे कौतुक करीत मला पाठबळ दिले आणि याच अपयशातून मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून सुवर्णपदक घेऊन बाहेर पडलो. माझ्या घरच्यांनी जर माझे अपयश माझे प्रयत्न म्हणून घेतले नसते, तर आज कदाचित मी अभिनेता नसतो.

देवाने या जगात पाठविताना आपल्या सर्वांमध्ये काही ना काही वेगळेपण दिले आहे. आपण मात्र आपल्यातील हे वेगळेपण विसरतो आणि तिसऱयाच गोष्टींमागे धावत त्यात आनंद शोधतो. हे चुकीचे असून आपल्यातील स्वतःला ओळखत त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. सामान्यांमधूनदेखील असामान्य होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी अपेक्षा खेर यांनी व्यक्त केली.

आज आपण स्वतःपासूनच दुरावत चाललो आहोत. लोकांशी नव्हे, तर लोकांबद्दल बोलण्यात धन्यता मानतो. हे टाळत स्वतःचा विचार करा, तुमची मते काय आहेत ती समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करा, असेही खेर यांनी या वेळी सांगितले.