|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत भीम सैनिकांचा एल्गार

सांगलीत भीम सैनिकांचा एल्गार 

प्रतिनिधी/ सांगली

भीमा-कोरेगाव घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करा. या घटनेची सीबीआय चौकशी करावी या मागण्यांसाठी सोमवारी आरपीआयच्या झेंडय़ाखाली हजारो भीम सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन देण्यात आले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मनुवादी विचारांच्या प्रवृत्तीकडून अडथळा निर्माण करण्यात येत असून यापुढे असे विचार जागेवरच ठेचण्यात येतील असा इशारा, आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी महापौर विवेक कांबळे यांनी यावेळी दिला.

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेर्धात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मोर्चाची हाक देण्यात आली होती. आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी महापौर विवेक कांबळे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, महिला आघाडी अध्यक्षा अपर्णाताई वाघमारे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासूनच विश्रामबाग चौकात आरपीआयचे कार्यकर्ते जमण्यास सुरवात झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाभरातून हजारो भीम सैनिक चौकात जमा झाले. डॉ. आंबेडकरांच्या विजयाच्या घोषणांनी त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोर्चास सुरूवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

घटना बदलण्याची भाषा करणाऱया प्रवृत्ती संपवा

‘जो हमे डराना चाहते है, उनको हमारा करारा जवाब मिलेगा’, असा इशारा देत आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी महापौर विवेक कांबळे म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मनुवादी विचारसरणीच्या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. समतेच्या विचारांमध्ये त्यांनी अडथळा आणण्याचे काम सुरु केले आहे, मात्र यापुढे मनुवादी विचारांचा प्रसार करणाऱया प्रवृत्तींना जागेवरच ठेचण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मनुवाद्यांनी अत्याचार केला. अनेक पिढय़ांनी हा अत्याचार सहन केला, मात्र आता अन्याय सहन केला जाणार नाही. 70 वर्षानंतर काही प्रवृत्ती घटना बदलण्याची भाषा करत आहेत, अशा प्रवृत्ती संपवा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

घटनेला आव्हान देणाऱयांना रोखण्यासाठी मोर्चा

भीमा-कोरेगाव घटनेची शासनाने गंभीर दखल घ्यावी, चौकशी करावी. दलित समाजाला न्याय द्यावा. धर्माच्या नावावर काही जणांच्याकडून तरुणांची डोकी भडकाविण्यात येत आहेत. घटनेला आव्हान देण्यात  येत आहे. ऍट्रॉसिटी केवळ एका समाजापुरती मर्यादित असल्याचे जे सांगतात त्यांनी आधी कायद्याचा अभ्यास करावा. ऍट्रॉसिटी ही एका समाजापुरती मर्यादित नसून ती 59 जातींसाठी आहे. त्यामुळे कोणी घटनेला आव्हान देण्याच्या फंदात पडू नये असा इशाराही कांबळे यांनी यावेळी बोलताना दिला. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे म्हणाले, दलित समाजांवर जो अन्याय झाला, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी. भीमा कोरेगाव घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

Related posts: