|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापशातील आमदारांचा सरकारवर विश्वास नाही

म्हापशातील आमदारांचा सरकारवर विश्वास नाही 

 

प्रतिनिधी/ म्हापसा

बार्देश तालुक्यातील आमदार तथा मंत्री फ्रान्सिस डिसोझा, उपसभापती मायकल लोबो, आमदार ग्लेन टिकलो यांना आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवावा लागतो. सत्ताधारी पक्षातील आमदारांचाच जर सरकारवर भरोसा नसेल तर सामान्य जनतेने तरी सरकारवर कसा विश्वास ठेवावा? असा सवाल उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राज्यात लोकशाहीचा खून झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी जीपीसीसी सदस्य सुदिन नाईक व युवा उपाध्यक्ष चंदन मांद्रेकर उपस्थित होते. म्हापशाचा काहीच विकास झालेला नाही. म्हापसा पालिकेतही नगरसेवकांमध्ये समन्वय नाही. बाजारपेठेत स्थानिक भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी जागा नाही. मार्केट निरीक्षक विक्रेत्यांकडून पैसे उकळत आहेत. करासवाडा येथे एका नगरसेवकाने भाजप कार्यालय सुरू करून ते बिगरगोमंतकीयाला दिले आहे. दोन नगरसेवक म्हापसा बचावासाठी लढत आहेत. या दोन्ही नगरसेवकांचा हेतू शुद्ध असल्याने आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. म्हापशाचा विकास आराखडा म्हापशातील हुशार अभियंत्यांला डावलून मुख्यमंत्र्यांनी प्रभूनामक वास्तूशिल्पकाराला दिला आहे. मुख्यमंत्री म्हापशाच्या बाबतीत राजकारण करत आहेत, असाही आरोप भिके यांनी यावेळी केला.

भाजी विक्रेत्यांचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन

म्हापशातील भाजीविक्रेत्यांचा प्रश्न येत्या 15 दिवसात सोडविण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही भिके यांनी यावेळी दिला. जीपीसीसी सदस्य नाईक यांनी, राज्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे, असा आरोप केला. म्हापशातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत असून पालिका मंडळ हप्ते वसुलीच्या मागे लागले आहे, अशीही टीका त्यांनी केली.

Related posts: