|Sunday, September 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आतातरी पाक धडा घेईल का?

आतातरी पाक धडा घेईल का? 

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला सोमवारी जशास तसे उत्तर देऊन एका दणक्यात पाकिस्तानचे 7 जवान आणि एका मेजरचा खात्मा केला. अगदी अलीकडेच भारताने एका जवानाच्या बदल्यात पाकिस्तानमध्ये घुसून 10 पाक सैनिकांना कंठस्नान घातले होते. पाकिस्तानसाठी भारताने दिलेला हा अंतिम इशारा होता, परंतु त्यातूनही पाकिस्तानच्या वागण्यात सुधारणा झालेली नाही. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पाक सैनिकांनी भारताच्या 4 जवानांचा बळी घेतला व भारताने पाकला जशास तसे उत्तर सोमवारी दिले. पाकिस्तानच्या एका मेजरसह 7 जवानांना भारतीय सैनिकांनी यमसदनी पाठविले. ही घटना अशावेळी झाली जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत भेटीवर आलेले आहेत. सोमवारीच साऱया भारतात लष्कर दिन साजरा करण्यात आला. नवी दिल्लीत झालेल्या परेडच्या निमित्ताने भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा दिलेला आहे. भारताने पाकिस्तानच्या अनेक कारवाया पाहिल्या, सहन केल्या परंतु आता भारत हे सहन करणार नाही. लष्कर प्रमुख बिपिन रावत जे काही बोलले ते प्रत्येक भारतीयाच्या मनातले बोललेले आहेत. पाकने चीनच्या सहकार्याने भारतात अनेक कारवाया केल्या. घुसखोरांना पाठवून दहशत निर्माण केली परंतु आता भारत घाबरत नाही. भारताने शत्रूच्या कोणत्याही कारवाईस चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसलेली आहे. भारताने पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचा हा निर्णय तसा फार उशिराच घेतला. अमेरिकेने पाकची आर्थिक मदत बंद करून पाकला योग्य धडा दिलेला आहे. आता भारताशी दोन हात करू पाहणाऱया पाकने आपली औकात काय आहे, यावर खरेतर फेरविचार करावा. पाकने कितीही उडय़ा मारल्या तरी त्यांचा कोणताही हेतू साध्य होणार नाही. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी रविवारी केलेल्या एका निवेदनात त्यांनी पाकिस्तानशी सामना करण्यासाठी जबाबदारी आमच्यावर सोपविल्यास आम्ही आमची मोहीम फत्ते करू, असा त्यांनी जो इशारा दिलेला आहे या मागे काहीतरी तयारी केल्याविना तरी बिपिन रावत बोलले नसतील, हे नक्कीच आहे. पाकने भारतावर अण्वस्त्र हल्ल्याचा जो इशारा दिलेला आहे त्यातून प्रत्यक्षात पाकिस्तानचे डावपेच पाकवरच उलटण्याची शक्यता आहे. रावत यांनी पाकिस्तानचे कोणतेही इरादे यशस्वी होऊ देणार नाही, असा जो इशारा दिलेला आहे, त्यातून भारत आता पाकिस्तानच्या कारवायांना जशास तसे उत्तर देताना प्रसंगी अणुशक्तीचा वापर करू, असा इशारा दिलेला आहे. पाकच्या मदतीला चीनशिवाय अन्य कोणतेही राष्ट्र येऊ शकत नाही. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी भारताबरोबर सोमवारी 9 करार करून भारताबरोबरची मैत्री अधिक दृढ केली. पाकिस्तानची आजवरची भूमिका पाहिल्यास या देशाने दहशतवाद्यांना पोसलेले आहे. पाकिस्तानात प्रशिक्षण देऊन दहशतवाद्यांना भारतात पाठविले जाते. एवढेच नव्हे तर अनेक देशात पाठवून दहशत माजविली जाते. त्यामुळे पाकिस्तानला अनेकांनी चांगलेच ओळखलेले आहे. अमेरिकेने मदत बंद केल्यानंतर पाकने थयथयाट सुरू केलेला आहे. आता तर इस्रायलदेखील भारताबरोबर असल्याने पाकचे सारेच मनसुबे धुळीस मिळालेले आहेत. मोदी हे जगातले एक क्रांतिकारी नेते आहेत, अशा शब्दात नेतान्याहू यांनी वर्णन केले आहे. इस्रायलसारख्या मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये देखील भारताबद्दल आस्था वाढत आहे. यामुळे पाकचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. भारताने सोमवारी पाकिस्तान हद्दीत घुसून पाकच्या लष्करावर चढविलेल्या हल्ल्यामुळे पाकचे बरेच नुकसान झालेले आहे व पाकची वैफल्यग्रस्तता पाकिस्तानला स्वस्थ बसू देत नाही. नियंत्रण रेषेवर पाक वारंवार भारतावर गोळीबार करत असतो. त्यामुळे भारतीय लष्कराच्या 70व्या वर्धापनदिनी सोमवारी भारताने सकाळीच केलेल्या बेधडक कारवाईत पाकिस्तानच्या 7 जवानाना ठार केले. पाकिस्तानला हा पुन्हा एकदा भारताने इशारा दिला आहे. समझनेवाले को इशारा काफी है! परंतु आतापर्यंत भारताने पाकला ‘एक का बदला दससे’ देऊनदेखील पाकमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. त्यामुळेच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी आता अंतिम इशारा दिलेला आहे. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. आता त्यातून पाकने काही धडा घेतला नाही तर सारा डाव पाकवरच उलटणार, यात शंका नाही. पाकला अशाच जोरदार प्रतिहल्ल्याची भाषा जर समजत असेल तर पाकने वेळीच शहाणे झाले पाहिजे होते. भारताने यापूर्वी मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना जो सर्जिकल स्ट्राईक केला होता त्याचा बदला घेऊ असा इशारा देणारा पाकच्या दहशतवादी म्होरक्यालाच नजरकैदेत टाकण्याची पाळी पाकवर आली होती. तेव्हा पाकने आपल्या स्वतःच्या देशात आर्थिक सुधारणा, शिक्षण क्षेत्रात सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. पाक आज चीनच्या मर्जीवर जगतो आहे. स्वाभिमानही गहाण टाकलेला आहे. दहशतवाद्यांनी पाकचे प्रशासनच आपल्या ताब्यात घेतलेले आहे. हे दहशतवादी कोणालाही ओळखत नाहीत. मानवतेचे शत्रू असलेल्यांना पाक पोसत आहे. एक दिवस हे दहशतवादी भस्मासूर बनून पाकच्या डोक्यावरच हात ठेवतील तेव्हा कुठे पाकिस्तानच्या नेत्यांचे डोळे उघडतील. भारताशी शत्रुत्व किंवा पंगा घेणे पाकिस्तानला परवडणारे नाही. उलट भारताकडे मैत्री केली असती तर एव्हाना पाक विकासाच्या प्रगतीपथावर पोहोचले असते. आज पाक आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात बराच मागे आहे. याला कारण तेथील राज्यकर्ते व वाढत्या दहशतीच्या कारवाया जबाबदार आहेत. भारतीय लष्कराने आतापर्यंत पाकच्या कारवाया फार सहन केल्या. आता भारताने जशास तसे एवढेच नव्हे तर ‘एक का बदला दससे!’ याप्रमाणे बदला व प्रत्युत्तर देणे चालू केले आहे. किमान यातून पाक योग्य धडा घेईल, अशी आशा व्यक्त करण्यास हरकत नाही.