|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » 26/11 हल्ल्यातील अनाथ मोशे भारतात

26/11 हल्ल्यातील अनाथ मोशे भारतात 

प्रतिनिधी, मुंबई

26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांचे छत्र गमावलेला मोशे होल्त्झबर्ग तब्बल नऊ वर्षानंतर भारतात परतला आहे. मंगळवारी सकाळी तो इस्रायलहून मुंबईत दाखल झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू मुंबईत एका स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोशे उपस्थित राहणार आहे.

मोशे त्याचा आजोबा रब्बी होल्त्झबर्ग नाचमन यांच्यासोबत मुंबई विमानतळावर आल्यानंतर इस्रायलच्या अधिकाऱयांनी मोशेचे स्वागत केले. इथे परत आल्यानंतर मोशे फारच खूश आहे. मोशे मुंबईत आला, त्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद. मुंबई आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे, असे मोशेचे आजोबा विमातळावर उतरल्यावर म्हणाले. दरम्यान, मोशेला मुंबईत राहून त्याचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती. 2008 मध्ये मुंबईत छाबडा हाऊसवर हल्ला झाला होता. यावेळी मोशे वाचला होता. या हल्ल्यावेळी मोशे अवघा दोन वर्षाचा होता. तो वडील गॅब्रिएल आणि आई रिवका यांच्यासोबत होता. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात मोशेचे आई-वडील मारले गेले. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या आई-वडिलांच्या मफतदेहाशेजारी बसून मोशे रडत होता. पण, त्याचवेळी धावून आलेल्या केअरटेकर सँड्राने मोशेचे प्राण वाचवले. एनएसजी कमांडोंनी तब्बल 24 तासांच्या थरारानंतर या दोघांची सुटका केली. आईöवडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर मोशे आजी-आजोबांकडे इस्रायलला गेला. सोबत मोशेला वाचवणारी सँड्राही तिथेच स्थिरावली. मोशे आता इस्रायलचा नागरिक आहे. सँड्रालाही नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. सँड्रा आता अपंग मुलांसाठी काम करते. पण, दर आठवडय़ाला ती मोशेला न चुकता भेटायला जाते.