|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा ही योगनगरी बनवा

गोवा ही योगनगरी बनवा 

प्रतिनिधी/ पणजी

‘गोवा भोग नगरी नव्हे तर योग नगरी बनवा. सर्वांना योग शिकवा. तसे केले तरच गोवा राज्यात परिवर्तन घडेल आणि गोवा योगमय होऊन जाईल’, असा सल्ला पतंजली योगपीठाच्या मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. सुमना दीदी यांनी दिला.

गोवा महिला पतंजली योग समितीतर्फे पाटो-पणजी येथील संस्कृती भवनातील हॉलमध्ये साधकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. सुमना दीदी बोलत होत्या. गोव्यात जास्तीत जास्त लोकांना योग शिकवा. जेवढे म्हणून देशी-विदेशी पर्यटक गोव्यात येतात. ते सर्वजण सकाळी-पहाटे उठून योग करायला बसले पाहिजेत. अनेकजण गोव्यात भोगनगरी म्हणून येतात परंतु ती नगरी बदलून आता योग नगरी करणे साधकांच्या हातात आहे. त्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना डॉ. सुमना दीदी यांनी पुढे बोलताना केली.

आपले शरीर म्हणजे शेकडो-हजारो नाडीने भरलेले आहे. त्या नाडीतून सातत्याने प्राणशक्ती प्रवाहीत होत रहाते म्हणून आपण आपली सारी दैनंदिन कामे करु शकतो. त्या नाडीला अर्थात प्राणशक्तीला कुठे बाधा आली तर मग शरीर आजारी पडते-रोग जडतो असे होऊ नये म्हणून नियमितपणे-सातत्याने प्राणायाम-ध्यान-योग-साधना करावी. रोग-आजार न होण्याची आणि झाला तर तो मिटवण्याची शक्ती त्यात आहे. तेच शरीरासाठी खरे औषध असून बाजारातील डॉक्टरांची वेगळी औषधे घेण्याची गरज नाही असेही डॉ. सुमना दीदी यांनी नमूद केले. गोवा राज्यातील योग साधनेचा विस्तार करण्यासाठी दरवर्षी येण्याची ग्वाही त्यांनी दिली तेव्हा उपस्थित साधकंनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. या मेळाव्याला आणि त्यांच्या मार्गदर्शनास गोव्यातील महिला-पुरुष साधकांनी भरघोस प्रतिसाद दिला. हॉल पूर्णपणे भरला होता. त्या प्रतिसादाने डॉ. सुमना दीदी भारावून गेल्या आणि त्यांनी साधकांकडून साधनाही करवून घेतली.

कवी भरत नाईक यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन त्यावेळी करण्यात आले. श्री. नाईक यांनी त्यानंतर थोडक्यात मनोगत प्रकट केले. 1008 कवितांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भारत स्वाभिमान ट्रस्टचे तसेच पतंजली योग समितीचे प्रमुख कमलेश बांदेकर यांनी सदर कार्यक्रम आयोजित केला होता. सुमारे तासभर डॉ. सुमना दीदी यांनी साधकांना मार्गदर्शन करताना व प्रवचन देताना स्वतःपासून सुरुवात करण्याचा मंत्र दिला.

 

Related posts: