|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » शनिवारपासून पुणेकरांना १६ एम.एम. चित्रपटांची मेजवानी

शनिवारपासून पुणेकरांना १६ एम.एम. चित्रपटांची मेजवानी 

 ऑनलाईन  टीम / पुणे :
  आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे. शनिवार, दि. २० व रविवार, दि. २१ जानेवारी रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या आॅडिटोरियमध्ये हा महोत्सव होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती संस्थेचे हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी डॉ.राजेंद्र खेडेकर, अ‍ॅड. मिलींद पवार, आण्णा देशपांडे, संजय गायकवाड, निकीता मोघे, चित्रपट दिग्दर्शक डॉ.शशिकांत डोईफोडे उपस्थित होते. महोत्सवाचे उद््घाटन शनिवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता प्रख्यात सिनेनिर्माते गजेंद्र अहिरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला सिनेनिर्माते विजय कोंडके, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, एनएफएआयचे संचालक प्रकाश मकदूम, राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे राज्याचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, राजेश तुपकर, मिहिर जोशी उपस्थित राहणार आहेत. 
हेमंत जाधव म्हणाले, उद््घाटन सोहळ्याला १६ एम.एम.चे ज्येष्ठ वितरक सुरेश एकबोटे, आण्णा देशपांडे, सतिश विसाळ, राहुल सगरे, संजीव भंडार, सज्जन लोहार यांचा सन्मान होणार आहे. तर, आॅस्कर अ‍ॅवॉर्ड परिक्षण समितीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. महोत्सवात तू सुखकर्ता, आई, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, चोरावर मोर, तांबव्याचा विष्णू बाळ आदी चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. तसेच काही शाळांमधील विद्यार्थ्यांना संग्रहालयातील जुन्या चित्रपटांच्या रिळ व यंत्रसामग्रीची माहितीही देण्यात येणार आहे. 
आण्णा देशपांडे म्हणाले, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली गेली, याचा पुणेकरांना अभिमान आहे. चित्रपट उद्योगाने मूक पट, बोलपट, कृष्णधवल ते रंगीत स्टिरिओ ते डॉल्बी साऊंड, इंस्तामान कलर ते फोर के असे अनेक बदल अनुभविले आहेत. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे १६ एम.एम.चित्रपट. चित्रपट सृष्टीतील हाच सुवर्णकाळ रसिकांपर्यंत पोहोचविण्याकरीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ चित्रपट पाहणे इतक्यापुरतेच मर्यादित न राहता पुणेकरांना कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील मिळणार आहे.