|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » यंदाची आयपीएल स्पर्धा 7 एप्रिल ते 27 मे पर्यंत

यंदाची आयपीएल स्पर्धा 7 एप्रिल ते 27 मे पर्यंत 

उद्घाटन सोहळा, स्पर्धेतील फायनलही मुंबईतच, यंदा रात्री 8 ऐवजी 7 वाजता व सायंकाळी 4 ऐवजी 5.30 वाजता सामन्यांना सुरुवात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील यंदाची 11 वी आवृत्ती दि. 7 एप्रिल ते 27 मे या कालावधीत खेळवली जाणार असून स्पर्धेचे उद्घाटन मुंबईत होईल व यंदाची फायनल देखील मुंबईतच होणार असल्याचे आयपीएल कार्यकारिणीने येथे जाहीर केले. प्रत्यक्ष सामन्यांना प्रारंभ होण्यापूर्वी दि. 6 एप्रिल रोजी मुंबईत उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱया स्टार स्पोर्ट्सच्या विनंतीनुसार, आयपीएल कार्यकारिणीने सामन्यांच्या वेळात बदल केले असून यानुसार, रात्री 8 वाजता सुरु होणारी लढत त्याऐवजी सायंकाळी 7 वाजता व सायंकाळी 4 ची लढत त्याऐवजी 5.30 ऐवजी खेळवली जाणार आहे.

रात्री 8 वाजता खेळवले जाणारे सामने खूपच उशिराने संपतात. ही बाब टाळण्यासाठी रात्री 8 ऐवजी सायंकाळी 7 वाजता सुरु करावी, अशी स्टार स्पोर्ट्सची विनंती होती. ती आयपीएल कार्यकारिणीने मान्य केली आहे, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. आयपीएल कार्यकारिणी सदस्य असलेल्या माजी कर्णधार सौरभ गांगुलीला मात्र या बैठकीत हजर राहता आले नव्हते.

‘विकेण्डला दिवसभरात दोन सामने होत असताना दोन्ही सामन्यांच्या वेळांची सरमिसळ होते, हे मान्य आहे. पण, स्टार स्पोर्ट्सकडे एकाच वेळी प्रक्षेपणासाठी अनेक वाहिन्यांचे पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनी वेळेत बदल करण्याची विनंती केली’, असेही शुक्ला याप्रसंगी म्हणाले. किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ घरच्या मैदानावरील 4 सामने मोहालीत व 3 सामने इंदोरमध्ये खेळेल, असा निर्णयही या बैठकीत संमत करण्यात आला. दोन वर्षांचे निलंबन पूर्ण करणाऱया राजस्थान रॉयल्सचे यंदा पुनरागमन होत असले तरी त्यांचे घरचे सामने कुठे खेळवायचे, याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयात दि. 24 रोजी होणाऱया सुनावणीत होणे अपेक्षित आहे.

‘सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे आणि बुधवारी न्यायालय त्याचा अंतिम निवाडा करेल, अशी अपेक्षा आहे. आम्ही निकालाची प्रतीक्षा करत आहोत. स्टेडियम सुसज्ज असेल तर जयपूरला प्राधान्य दिले जाईल. राजस्थान क्रिकेट संघटनेला न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवणेही आवश्यक असेल. असे झाले नाही तर मात्र या संघाचे सामने पुण्यात होतील’, असे शुक्ला म्हणाले. यंदाच्या आवृत्तीसाठी बेंगळूर येथे दि. 27 व 28 रोजी आयपीएल लिलाव होणार असून त्यासाठी 360 भारतीय खेळाडूंसह 578 खेळाडू उपलब्ध असणार आहेत.