|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फ्रान्सिस परेराची जामिनावर सुटका

फ्रान्सिस परेराची जामिनावर सुटका 

प्रतिनिधी/ म्हापसा

गेल्या वर्षी दक्षिण गोव्यात क्रॉसची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याची न्यायालयाने 18 प्रकरणात निर्दोष मुक्तता केल्याने उर्वरीत चार प्रकरणांमध्ये त्याची जामिनावर मुक्तता केली. एकूण 22 प्रकरणात पोलिसांनी बॉयवर आरोपपत्र दाखल केले होते. पैकी दोन तक्रारी खोटय़ा होत्या तर दोघा तक्रारींवरील आरोप सिद्ध व्हायचे आहेत.

दक्षिण गोव्यात गेल्या वर्षी जून – जुलै महिन्यात मोठय़ा प्रमाणात क्रॉसची मोडतोड झाली होती. याबाबत पोलिसांवर अनेक आरोप झाले होते. शिवाय कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक न झालयास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या प्रकरणी 15 ऑगस्टच्या मध्यरात्री पोलिसांनी कुडचडे येथे या प्रकरणात फ्रान्सिस परेरा याला ताब्यात घेतले होते.

त्याची मारुती व्हॅन जप्त केली असता मोडतोडीसाठी लागणारे साहित्य गाडीत सापडले. चौकशीअंती फ्रान्सिसने 22 ठिकाणी आपण मोडतोड केल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर 22 आरोपपत्र दाखल केले होते. यातील 18 गुह्यातून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी फ्रान्सिसची निर्दोष मुक्तता केली होती. अद्याप चार प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. बुधवार दि. 24 जानेवारी रोजी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 295 धार्मिकस्थळांची मोडतोड करणे, 297 घुसखोरी करणे या कलमाखाली गुन्हा नोंद केला होतो.

आपल्याविरुद्ध राजकीय सूड उगवला : फ्रान्सिस परेरा

दरम्यान, फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय बुधवारी सायंकाळी 5.30 वा.च्या दरम्यान कोलवाळ कारागृहाबाहेर पडला त्यावेळी तो म्हणाला, आपल्याला कोठडीत डांबण्यामागे राजकीय सूड असून आपल्यावर नाहक खोटे आरोप करण्यात आले आहे. आपण 2000 साली पंचायत निवडणुकीच्या रिंगणात होतो तो राग आमदार नीलेश काब्राल यांना होता. त्यांनी व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपला पद्धतशीरपणे काटा काढला. आपल्यास अटक करण्यास पोलीस निरीक्षक भानुदास देसाई यांनी चोख कामगिरी बजावली. आपल्यावर नाहक खोटे आरोप ठेवण्यात आले. आपल्याला अटक झाली त्यादिवशी आपण भाडे घेऊन वास्कोला गेलो होतो. भाडेकरु पुरावा आहे मग आपण क्रॉसची मोडतोड कशी करणार? सबळ पुराव्याअभावी आपली सुटका झाली आहे. आपण पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागील राजकीय षडयंत्राचा उलगडा करणार असल्याची माहिती फ्रान्सिसने दिली.

त्याच्यासमवेत भाऊ तसेच कापूचीन फादर ब्रायन पिंटो व फादर प्रँकी फर्नांडिस उपस्थित होते.

Related posts: