|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » टेनिस ‘मॅन’

टेनिस ‘मॅन’ 

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपणच खऱया अर्थाने टेनिसविश्वाचा किंग असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे ज्या वयात टेनिसपटू निवृत्ती स्वीकारतात किंवा फॉर्मसाठी झगडताना दिसतात, त्या वयात म्हणजेच 36 व्या वर्षी ही कामगिरी साकारत कलात्मकता ही सदैव तरुण असते, हेच त्याने सिद्ध केले आहे. तब्बल 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांवर नाव कोरणाऱया फेडररच्या खेळाचा दर्जा पाहता त्याच्या पदकांची संख्या भविष्यात आणखी वाढू शकेल. टेनिस जगतावर रॉय इमर्सन, बियॉन बोर्ग, जॉन मॅकेन्रो, जिम कुरियर, रॉड लेव्हर, इव्हान लेंडल, बोरीस बेकर, स्टिफन एडबर्ग, आंद्रे आगासी, पीट सॅम्प्रस, गोरान इव्हानसेविच, टिल्डन यांच्यापासून ते आत्ताच्या नोवाक जोकोविच व राफेल नदाल यांच्यासारख्या अनेक टेनिसपटूंनी अधिराज्य गाजवले आहे. मात्र, यामध्ये फेडररची नजाकत विशेष उठून दिसते. अलीकडे झंझावातासारखी आक्रमकता, ताकदवान फटके व भन्नाट वेगाने टेनिसच्या कोर्टला व्यापले आहे. त्यामुळे कलात्मकता काहीशी मागे तर नाही ना पडणार, अशी स्थिती पहायला मिळत होती. मात्र, फेडररने कलात्मकतेशिवाय पर्याय नाही, हेच पुन्हा नि पुन्हा अधोरेखित केले आहे. म्हणूनच धडाडत्या रायफलच्या आवाजी दुनियेतही त्याचे शांतपणे रॅकेट वल्हवणे अधिक आल्हाददायी नि आनंदमय ठरते. फेडररचा खेळ म्हणजे जणू खळाळता आनंदझरा. अप्रतिम पदलालित्य, सूर ताल लयबद्धतेने नटलेले फटके, बॅकहँडची जादू अन् कमालीचा संयतपणा ही सगळीच वैशिष्टय़े खेळाला एका विशिष्ट उंचीवर नेणारी. त्यामुळेच इथवर फेडररने मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियनसह प्रेंच, विम्बल्डन, अमेरिकन ओपन या चार ग्रँडस्लॅम स्पर्धा फेडररने जिंकल्या आहेत. प्रतिष्ठेच्या विम्बल्डनवर तर तब्बल आठ वेळा त्याने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे ग्रास कोर्टचा बादशहा असेही त्याला संबोधले जाते. ऑस्ट्रेलियनची 6 व अमेरिकनची 5 जेतेपदेही त्याने पकटावली आहेत. पेंच ओपनमध्ये मात्र त्याला केवळ एकदाच वर्चस्व गाजवता आले आहे. लाल मातीत ताकदवान व रांगडय़ा खेळासाठी प्रसिद्ध असलेला राफेल नदाल अधिक सरस असल्याने या स्पर्धेत फेडररला अनेकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. परंतु, त्यामुळे त्याच्या कामगिरीचे मोल अजिबात कमी होत नाही. पीट सॅम्प्रसचा 14 जेतेपदांचा विक्रम मोडणाऱया फेडररला मागच्या काही वर्षात झगडावे लागेल. दुखापत व वयोमानामुळे हालचालींवर आलेल्या मर्यादा, यामुळे फेडरर संपत चालल्याची हाकाटी पिटली जात होती. 2013, 14, 15 व 16 अशा तब्बल चार वर्षांमध्येही त्याच्या नावावर एकाही जेपेपदाची नोंद नसणे, यातून फेडरर युगाचा अस्त झाला, असे कुणालाही वाटणे तसे स्वाभाविक. मात्र, क्लास हा शेवटी क्लास असतो. त्याला जिद्द, मेहनत व तंदुरुस्तीची जोड मिळाली, तर काय करता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्याच्या पुनरागमनाकडे पहावे लागेल. सराव सामन्यातही उत्साहात खेळणाऱया रॉजरने चाहत्यांच्या प्रेमामुळेच आपल्याला नवी उमेद मिळत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्याच्या या विनम्रतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खेळाडू म्हणून महान असलेला फेडरर माणूस म्हणूनही किती श्रेष्ठ आहे, याचे दर्शन टेनिसप्रेमींनी वारंवार घेतलेच आहे. मुख्य म्हणजे तो टेनिसवर जीवापाड प्रेम करतो. खिलाडूवृत्ती तर त्याच्या नसानसात भिनलेली. त्यामुळे त्याच्याकडून कधीही आक्रस्ताळेपणा, अखिलाडूपणा झाल्याचे स्मरत नाही. स्वत:ला झोकून देत संपूर्णत: टेनिसमय होऊन जायचे, हाच त्याचा पिंड. ही सर्मपणवृत्ती, अफाट एकाग्रता, कोर्टच्या जमिनीशी जुळलेले घट्ट बंध ठायीठायी जाणवत राहतात. अन्य टेनिसपटू वा नव्या दमाच्या खेळाडूंचे उदारपणे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहित करणे, ही त्याची आणखी एक बाजू. त्याने स्पर्धा केली, ती फक्त स्वत:शी. सॅम्प्रसचा विक्रम मोडण्यासाठी तो कधी खेळला नाही आणि भविष्यात आणखी कुणी आपला विक्रम मोडू नये, म्हणून खेळत राहणे, हीदेखील त्याची वृत्ती नाही. कारण टेनिस म्हणजे फेडरर आणि फेडरर म्हणजे टेनिस, इतके हे सारे समानार्थी बनले आहे. 1981 मध्ये जन्मलेल्या आणि 1998 पासून टेनिसला प्रारंभ करणारा फेडरर बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉलदेखील खेळत असे. परंतु, त्याची अद्वितीय कामगिरी पाहता त्याचा जन्म केवळ टेनिससाठीच झाला होता, असे म्हणावे लागेल. मुख्य म्हणजे तो अत्यंत संवेदनशील माणूस आहे. अनेक परोपकारी संस्थांना मदत करण्याकामी तो पुढाकार घेतो. आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक प्रदर्शनीय सामने तो खेळला आहे. रॉजर फेडरर फौंडेशनच्या माध्यमातूनही त्याने तळागाळातल्या लोकांना मदत केली आहे. त्यामुळे टेनिसचा हा किंग संतमाणूसच शोभतो. आजमितीला फेडररच्या काहीसा जवळपास केवळ नदाल पहायला मिळतो. नदालच्या खात्यात 16 पदके आहेत. दुखापतीने ग्रासल्याने त्याच्यासमोरही आव्हाने आहेत. मात्र, आपण फेडररयुगात खेळलो, याचा त्यालाही अभिमान वाटतो, यातच सारे आले. या दोघांमधील लढतीने चाहत्यांना नेहमीच आनंद दिला. भविष्यात स्टॅमिना, फिटनेस राखतानाच सातत्यपूर्ण कामगिरीकडेदेखील या दोघांनाही लक्ष द्यावे लागेल. ग्रँड स्लॅम अंतिम लढतीत तब्बल 30 वेळा खेळणे, तिशीनंतर चार वेळा ग्रँड स्लॅमवर नाव कोरणे, या फेडररच्या साऱया गोष्टी अद्भुत ठरतात. सातत्य, वीजिगीषू वृत्ती, एकाग्रता, संयतपणा, शक्तीपेक्षा युक्ती, तंत्रशुद्धतेवर त्याच्याकडून दिला जाणारा भर साऱयांसाठीच प्रेरणादायी म्हटला पाहिजे. अर्थात त्याच्या या यशात त्याच्या सहचारिणीचाही मोठा वाटा आहे. भारताकडून लिएंडर पेस, महेश भूपती, रोहन बोप्पण्णा, सानिया मिर्झा या भारतीय खेळाडूंनीदेखील दुहेरीत आपला दर्जा सिद्ध केला आहे. मात्र, एकेरीत आपली पाटी कोरी आहे. हे पाहता फेडररसारख्या खेळाडूंकडून नव्या दमाच्या खेळाडूंनी आदर्श घ्यायला हवा. शासनानेही टेनिस कल्चर निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. त्यातूनच आपल्यालाही एखादा नजाकतीचा बादशहा गवसू शकेल, अशी आशा करुयात.

Related posts: