|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » यावर्षी आंबा हंगाम केवळ दोन महिन्यांचा?

यावर्षी आंबा हंगाम केवळ दोन महिन्यांचा? 

ओक्खी वादळाचा परिणाम

ठराविक दिवसात भरपूर आंबे,

बाजारात स्वस्ताई होण्याची शक्यता

प्रतिनिधी /रत्नागिरी

यंदांच्या हंगामात हापूस आंबा थोडासा उशिरा भरास येईल. त्याचा दरही तुलनेने कमी असेल. ओक्खी वादळामुळे सुरुवातीस विलंब व एकदम तयार झाल्याने किंमतीत कमी असा प्रकार होण्याची शक्यता मुंबई-पुण्यातील दलालांनी व्यक्त केली आहे. कोकणातील बागायतदारांनी त्याला दुजोरा दिला आहे.

पुणे येथील घाऊक फळ बाजारातील विक्रेते रोहन उरसल यांनी सांगितले की, ओक्खी नावाच्या चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनाऱयावरील हापूस आंबा कलमांवर परिणाम झाला आहे. कर्नाटक, केरळसह राज्यातील आंब्याला उशिरा मोहोर येत आहे. कोकणातून आंबा बाजारात येण्याची सुरुवात झाली आहे. ते प्रमाण तुरळक आहे. एप्रिलमध्ये आंबा मोठय़ा प्रमाणात बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे आणि मे महिन्यात हापूस आंब्याचा सर्व हंगाम संपेल.

वृत्तसंस्थांशी बोलताना ते पुढे म्हणाले, यावर्षी हापूस आंब्याचा हंगाम दरवर्षीपेक्षा थोडका असेल. तथापि आंबा एकदम झाल्याने तो स्वस्त होईल. देवगड येथील आंबा उत्पादक संस्थेचे विद्याधर जोशी म्हणाले, यावर्षी वेळेवर कलमे मोहरण्यास उशिर झाला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पहिला मोहोर दिसून आला. मोहोरानंतर 110 दिवसांनी फळ काढण्यास तयार होते. अद्याप अनेक ठिकाणी फळधारणा दिसून येत नाही. एप्रिलच्या पुढे फळे उपलब्ध होतील. ते ही हवामान चांगले असेल तरच! याशिवाय गळतीतून फळे बचावली तर अपेक्षित उत्पन्न येईल. दरवर्षी आंब्याचे घाऊक विक्रेते हंगामाचा अंदाज बांधतात आणि मागणी लक्षात घेऊन दर ठरवत असतात. यावर्षी ओक्खी वादळामुळे लांबलेल्या आंबा हंगामाचा परिणाम दर कोसळण्यात होतो काय? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

यावर्षी मुंबई बाजारातदेखील दरवर्षीच्या तुलनेने हापूस आंब्याची कमी आवक असल्याचे दिसून येत आहे. सध्या केवळ 400 पेटय़ा हापूस आंबा मुंबई बाजारात दाखल होत आहे. महाशिवरात्रीचा दिवस जवळ आला तरी आंबा दरवर्षीच्या तुलनेत मुंबई बाजारात पोहोचलेला नाही. सुमारे 6000 रुपयांपर्यंत प्रतिपेटीला दर मिळत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Related posts: