|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » वनडे क्रमवारीत टीम इंडियाचे वर्चस्व

वनडे क्रमवारीत टीम इंडियाचे वर्चस्व 

वृत्तसंस्था/ दुबई

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील दमदार कामगिरीचा फायदा भारतीय संघासह संघातील खेळाडूंनाही झाला आहे. ऐतिहासिक वनडे मालिकाविजय मिळवताना टीम इंडियाने सांघिक क्रमवारीत 122 गुणासह अग्रस्थान भक्कम केले आहे. 558 धावांची बरसात करणारा कर्णधार विराट कोहली 909 गुणासह अग्रस्थान मिळवले असून गोलंदाजीतही बुमराहने पहिले स्थान काबीज केले आहे.

आयसीसीने मंगळवारी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली. वनडे क्रमवारीत 900 गुणांचा टप्पा गाठणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीच्या आधी सर व्हिव्हियन रिचर्डस, झहीर अब्बास, जावेद मियाँदाद, ग्रेग चॅपेल व डेव्हिड ग्रोवर यांनी आपल्या कारकिर्दीत 900 गुणांचा टप्पा गाठला होता. कोहली सध्या 909 गुणासह अग्रस्थानी आहे. कसोटी व वनडेत 900 पेक्षा जास्त गुण मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. द.आफ्रिकेचा डिव्हिलियर्स 844 गुणासह दुसऱया तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 823 गुणासह तिसऱया स्थानी आहे.

गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने तिसऱया स्थानावरुन पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. द.आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत 8 बळी मिळवत चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या आधारे बुमराह 787 गुणासह अग्रस्थानी पोहोचला आहे. अफगाणच्या रशीद खानचे 787 गुण असून सरासरीच्या आधारे रशीद दुसऱया स्थानी आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट 729 गुणासह तिसऱया स्थानी कायम आहे.

सांघिक क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा

यजमान द.आफ्रिकेविरुद्ध 5-1 असा ऐतिहासिक वनडे मालिकाविजय मिळवताना टीम इंडियाने आपले अग्रस्थान आणखी भक्कम केले. ताज्या क्रमवारीत टीम इंडिया 122 गुणासह पहिल्या स्थानी आहे. द.आफ्रिका 117 गुणासह दुसऱया, इंग्लंड 116 गुणासह तिसऱया, न्यूझीलंड 115 गुणासह चौथ्या तर ऑस्ट्रेलिया 112 गुणासह पाचव्या स्थानावर आहे.

Related posts: