|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सर्वण येथील श्री शामपुरूष मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

सर्वण येथील श्री शामपुरूष मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात 

प्रतिनिधी/ डिचोली

सर्वण डिचोली येथील श्री शामपुरुष मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा तसेच श्रीशामपुरुष, व्याघ्रेश्वर, मुळपुरूष व द्वारपालवस देवतांच्या नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि शिखर कलशारोहण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठय़ा उत्साहात पार पडला.

त्यानिमित्त दि. 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार दि. 25 रोजी श्रीशामपुरुष, व्याघ्रेश्वर, मुळपुरूष व द्वारपालवस देवतांच्या नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी महाप्रसाद व सायं. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका विमोचन व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सभापती तथा सांखळीचे आमदार प्रमोद सावंत, सन्माननीय अतिथी म्हणून मयेचे आमदार प्रवीण झांटय़े आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर, कारापूर सर्वणचे सरपंच रमेश सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याशिवाय देवस्थान अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष सुर्या सावंत, सचिव तुळशीदास सावंत, आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी बोलताना सभापती प्रमोद सावंत यांनी सर्वण या गावास नैसर्गिक पार्श्वभूमी असून श्री शामपुरूष मंदिरास महत्व आहे. पुरातन काळी हे मंदिर म्हणजे येथील संस्कार शक्ती केंद्र असू शकते, असे सांगितले.

आमदार प्रवीण झांटय़े यांनी आपल्या भाषणात या मंदिराच्या निर्मितीसाठी गावातील लोकांनी ज्या एकोप्याचे दर्शन घडविले आहे ते प्रशंसनीय असल्याचे सांगितले. हा एकोपा भविष्यातही टिकवून ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

त्यानंतर या मंदिराच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱया सर्वांचा  भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रधान आचार्य वेदशास्त्रसंपन्न किशोर भावे यांच्यासह अन्य ब्रह्मवृंदांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

देवस्थान अध्यक्ष अमोल सावंत यांनी स्वागत केले. अनिल सावंत यांनी सुत्रसंचालन केले. खजिनदार भालचंद्र सावंत यांनी आभारप्रदर्शन केले. रात्री 9 वा. ‘अगाध महिमा साईंचा’ या नाटय़प्रयोगाच्या सादरीकरणाने सोहळ्याची सांगता झाली.

Related posts: