|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » महिला उद्योजक मानांकनात भारत 52 वा

महिला उद्योजक मानांकनात भारत 52 वा 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांना पुरुषांच्या तुलनेत समान संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून भारत अजूनही उद्योग क्षेत्रात महिला उद्योजकांच्या बाबतीत खूपच मागे असल्याचे समोर आले आहे. मास्टरकार्डकडून सादर करण्यात आलेल्या महिला उद्योजिका निर्देशांकमध्ये 57 देशांच्या यादीमध्ये भारत 52 व्या स्थानी आहे. स्थानिक पातळीवर महिलांना उद्योग क्षेत्रात विविध पातळीवर मिळणाऱया संधीचा अभ्यास करण्यात आला आहे. या यादीमध्ये अमेरिका पहिल्या पाचमध्ये, चीन पहिल्या तीस देशांमध्ये आहे. शेवटच्या पाच देशांमध्ये इराण, सौदी अरेबिया, अल्जेरिया, इजिप्त आणि बांगलादेश या देशांचा भारतानंतर क्रमांक लागतो.

अन्य देशांच्या तुलनेत भारतातील महिलांना संधी मिळण्याचे प्रमाण कमी आहे. सांस्कृतिक वातावरणामुळे भारतीय महिलांचा उद्योग क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन अद्याप बदललेला नाही. काही महिलांकडे व्यवसायाची मालकी असून त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे वृद्धी होत असल्याचे दिसून येत नाही. महिलांना आवश्यक त्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळत नसल्याचे उद्योग बंद करण्याचे प्रमाण जास्त आहे.

विकसित देशांच्या तुलनेत भारतीय महिलांना उद्योग क्षेत्रात कमी संधी आहेत. त्यामुळे या क्षेत्रात उतरणाऱया महिलांची संख्या कमी आहे. महिलांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून त्यासाठी आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पातळीवर बदल झाल्यास देशातील महिलांना अधिक संधी दिल्यास उत्तम प्रकारे हाताळू शकतात असे मास्टरकार्डच्या मार्केटिंग विभागाच्या उपाध्यक्षा मानसी नरसिंहन यांनी म्हटले.

आर्थिक ज्ञान आणि संपत्तीच्या बाबतीत भारताचा 55 वा क्रमांक लागतो. उद्योग क्षेत्रात समर्थनीयतेच्या बाबतीत भारत 47 व्या स्थानी आहे. न्यूझीलंड या   निर्देशांकामध्ये अव्वल स्थानी असून स्वीडन, कॅनडा, अमेरिका, सिंगापूर यांचा पहिल्या पाच देशांत समावेश आहे. या 57 देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

Related posts: