|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पुतळा विटंबनेचे लोण आता केरळात

पुतळा विटंबनेचे लोण आता केरळात 

कन्नूर / वृत्तसंस्था :

केरळच्या थालीपारंबा भागात महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला काही अज्ञातांनी नुकसान पोहोचविले आहे. पुतळय़ाचा चष्मा गुरुवारी तुटलेल्या अवस्थेत सापडला. तर बुधवारी रात्री तामिळनाडूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ावर काही जणांनी रंग ओतला होता. या अगोदर त्रिपुरामध्ये भाजपच्या विजयानंतर तेथे रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते ब्लादिमीर लेनिन यांचे दोन पुतळे जमीनदोस्त करण्यात आले होते. यानंतर देशभरात ठिकठिकाणी महापुरुषांच्या पुतळय़ाला नुकसान पोहोचविण्यात आले आहे.

देशभरात मागील 4 दिवसांमध्ये 7 पुतळय़ांना नुकसान पोहोचविण्यात आले आहे. गुरुवारी उत्तरप्रदेशच्या बलिया येथे देवाच्या मूर्तीसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे  हा घटनाक्रम जातीय तसेच सांप्रदायिक संघर्षाचे रुप घेण्याची भीती व्यक्त होतेय. बुधवारी या प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विट करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्रिपुरा : 2 दिवसांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी लेनिन यांचे दोन पुतळे पाडले आहेत. त्रिपुरामध्ये निकाल जाहीर झाल्यावर सोमवारी भाजप समर्थकांनी बेलोनियामध्ये 11.5 फूट उंच लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने पाडला होता. मंगळवारी देखील राज्यात लेनिन यांचा एक पुतळा तोडण्यात आला. राज्यात 25 वर्षांपासूनची डाव्यांची सत्ता संपुष्टात आणत भाजपने पूर्ण बहुमत मिळविले आहे. तर बुधवारी माकप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात भाजपचे 5 कार्यकर्ते जखमी झाले.

तामिळनाडू : तिरुवेत्तुयूरमध्ये बुधवारी रात्री आंबेडकर यांच्या पुतळय़ावर अज्ञातांनी रंग ओतला. या अगोदर वेल्लोर जिल्हय़ात मंगळवारी रात्री समाजसुधारक आणि द्रविड आंदोलनाचे संस्थापक ईव्ही रामासामी पेरियार यांच्या पुतळय़ाचे नुकसान करण्यात आले. हे दुष्कृत्य भाजप नेते एच. राजा यांच्या फेसबुक पोस्टवर झाल्याने भाजपची गोची झाली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून यातील एक जण भाजप तसेच दुसरा माकपशी संबंधित आहे. तर कोईम्बतूर येथे भाजप कार्यालयावर पेट्रोलबॉम्बने हल्ला करण्यात आला.

Related posts: