|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पालकमंत्र्यांना दाखविले वाळू व्यावसायिकांनी काळे झेंडे

पालकमंत्र्यांना दाखविले वाळू व्यावसायिकांनी काळे झेंडे 

14 जणांना अटक

वार्ताहर / वेंगुर्ले:

हॉटेल व्यावसायिकांची मर्जी सांभाळण्यासाठी वाळू उपशावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हय़ात काही ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा सुरू असून त्याला पालकमंत्र्याचे अभय असल्याचा आरोप आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील वाळू व्यावसायिकांनी करीत उभादांडा शाळा नं. 2 येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांना काळे झेंडे दाखवित घोषणाबाजी केली.

टांक येथील बडय़ा हॉटेल व्यावसायिकांशी केसरकर यांचे हितसंबंध असल्याने वाळू उपशावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील वाळू व्यावसायिक यांच्या रोजगारावर झाला आहे. केसरकर हे आपल्या मतदारसंघातील वाळू व्यावसायिकांना न्याय देवू शकत नसल्याचा आरोप करीत सुमारे 50 वाळू व्यावसायिकांनी मंगेश पाडगावकर आदरांजली कार्यक्रम आटोपून येत असताना उभादांडा शाळा नं. 2 च्या नजिक पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवित निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शहरात येण्याचा दौरा रद्द करुन ते परस्पर शिरोडय़ाच्या दिशेने निघून गेले.

केसकरकरांमुळेच अन्याय!

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामुळेच आरवली-मोचेमाड भागातील वाळू व्यावसायिकांवर अन्याय झाला आहे. टांक येथील बडय़ा हॉटेल मालकाने उच्च न्यायालयात वाळू उपसा बंदीसाठी दावा दाखल केला आहे. यात आम्ही पूर्वीच कॅव्हेट दाखल केलेले असल्याने आमची बाजू मांडण्याची मुभा मिळेल. त्यावेळी आमची बाजू भक्कम व पुराव्यासह मांडू. मात्र, शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्यासाठी हॉटेल मालकाला पालकमंत्र्यांनी सहकार्य केल्यामुळे वाळू व्यावसायिकांवर अन्याय झाल्याची माहिती अभिषेक गावडे यांनी दिली.

टांक, आरवली, मोचेमाड नदीच्या समुद्राकडील टोकाचा गाळ उत्खननाने काढल्याशिवाय या भागाचा पर्यटनदृष्टय़ा विकास होणार नाही. शासनाने या नदीत नौकानयनसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे होते. सन 2012 पासून या भागातील वाळू काढण्यास बंदी घातली आहे. मोचेमाड पुलाच्या डावीकडील वरचा पट्टा भागापासून पालपर्यंत वाळू काढण्याची निविदा सन 2017-18 वर्षासाठी काढण्यात आली. त्यातून तीन कोटीचे उत्पन्न शासनाला मिळाले. मेरिटाईम बोर्डानेही तेथील वाळू काढणे हे धोकादायक ठरविलेले नाही, असे ते म्हणाले.

यावेळी अभिषेक गावडे, सिद्धेश नाईक, राजन आरावंदेकर, उमेश राणे, संतोष चोडणकर, उल्हास वेंगुर्लेकर, रंगनाथ गावडे, राजाराम कोचरेकर, धीरज परब यांच्यासह सुमारे 50 वाळू व्यावसायिक उपस्थित होते.

काळे झेंडे दाखविणाऱयांवर कारवाई करा!

वाळू उपशावर असलेली बंदी ही न्यायालयाची आहे. त्याच्याशी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कोणताही संबंध नसताना आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील वाळू व्यावसायिकांनी केसरकर यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला. पालकमंत्र्यांविरोधात दिलेल्या घोषणा हा प्रकार निंदाजनक असून संबंधितांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा शिवसेनेतर्फे विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय गवस यांना दिला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख विवेक आरोलकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, सभापती यशवंत परब, तालुका दक्षता समिती अध्यक्ष सचिन वालावलकर, सुरेश भोसले, सुरेश वराडकर, उपशहरप्रमुख अभिनय मांजरेकर, हेमंत मलबारी, मनोहर येरम, दादा सारंग, संदीप केळजी, पंकज शिरसाट, देवेंद्र जुवलेकर, प्रसाद बागायतकर, आनंद बटा, सुहास मेस्त्राr उपस्थित होते.

Related posts: