|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राकुसलेवाडीत शॉर्टसर्किटने चार घरे भस्मसात

राकुसलेवाडीत शॉर्टसर्किटने चार घरे भस्मसात 

प्रतिनिधी/ नागठाणे

राकुसलेवाडी (ता. सातारा) येथे रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार घरे भस्मसात झाली आहेत. सुदैवाने गावातील युवक आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग चार तासाने आटोक्यात आली. अन्यथा संपूर्ण गाव आगीत बेचिराख झाले असते. या आगीत सुमारे 70 लाखाचे नुकसान झाले असून यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

       याबाबत बोरगाव पोलीस ठाणे व घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, आसनगाव जवळ असणाऱया राकुसलेवाडी गावात मध्यवस्तीत प्रमोद आनंदराव मोरे, अजय श्रीरंग मोरे, अरुण तात्याबा मोरे, लक्ष्मण यशवंत मोरे यांची घरे आहेत. प्रमोद मोरे यांच्या घरी त्यांची आई रत्नाबाई या असतात. तर इतर तिन्ही घरातील सर्वजण मुंबईला कामानिमित्त स्थायिक असल्याने यांची घरे बंद असतात. रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास प्रमोद मोरे यांच्या घरास अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. ही आग शेजारी असणाऱया लहान मुलाने पहिली आणि त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी गावातील युवक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी आपल्यापरीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱयामुळे आग जास्तच भडकली. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी सातारा नगरपालिका आणि अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलास व बोरगाव पोलीस ठाण्यास दुरध्वनीवरून देण्यात आली. काही वेळातच दोन्ही अग्निशमन दलाच्या गाडय़ांनी घटनास्थळी दाखल झाल्या. 

      ग्रामस्थ, युवक, महिलांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. सुमारे चार तासाच्या प्रयत्नानंतर रात्री 1 वाजता ही आग विझविण्यात त्यांना यश आले पण तोपर्यत चार घरे जळून खाक झाली होती. अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने ही आग आटोक्यात आली अन्यथा संपूर्ण गावच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. याघटनेची माहिती समजताच बोरगाव पोलीसठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेतली.

         या आगीत या चारही घरातील सोने, चांदी, रोख रक्कम, लाकूडफाटा, गवत, एलआयसी कागदपत्रे, घरातील धान्य आदी सुमारे 70 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार इंगुळकर करीत आहेत.

Related posts: