|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » गोंधळामुळे संसदेचे कामकाज ठप्पच

गोंधळामुळे संसदेचे कामकाज ठप्पच 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा   सरकार-विरोधकांचे परस्परांवर आरोप

वृत्तसंस्था/. नवी दिल्ली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होऊन 7 दिवस उलटून देखील संसदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. मंगळवारी देखील गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. तेलगू देसम पक्ष आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस समवेत विरोधी पक्ष पीएनबी घोटाळय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभागृहातील वक्तव्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने कोंडी सुटण्याची चिन्हे नाहीत.

लोकसभेत 28 पैकी 21 विधेयके या अधिवेशनात प्रलंबित आहेत. राज्यसभेत 39 विधेयके प्रस्तावित आहेत. कामकाज होतच नसल्याने महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळणे कठिण होऊन बसले आहे.

सरकारची भूमिका

सभागृहाच्या कार्यसूचीत सर्व महत्त्वाच्या विषयांचा समावेश केला आहे. सभागृहाच्या कामकाजात भाग घेत सार्थक चर्चा घडवून आणण्याचे आवाहन सर्व पक्षांना करत असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी मंगळवारी म्हटले.

लोकशाहीवर विश्वास नसावा

काँग्रेस आणि अन्य पक्षांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे वाटते. दोघेही संसदेबाहेर लोकशाहीबद्दल मोठमोठी विधाने करतात, परंतु सभागृहात त्यावर अंमल करत नाहीत. काँग्रेसच्या गुणसूत्रांमध्येच लोकशाही नसल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेसकडून लक्ष्य

सरकार लोकशाहीला धक्का देणारी पावले उचलत आहे. सरकारच लोकशाहीविरोधी असून काँग्रेसवर विनाकारण आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले.

संसदेत 67 विधेयके प्रलंबित

w दोन्ही सभागृहांसमोर देशासाठी अत्यंत महत्त्वाची विधेयके प्रलंबित आहेत. अनेक मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक.

w तिहेरी तलाक संबंधित विधेयक राज्यसभेत मांडले गेल्यास विरोधक बॅकफूटवर जाऊ शकतात.

w फरार आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता जप्तीचे विधेयक मांडल्यास विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.

w जुनी 67 विधेयके संसदेत प्रलंबित असून यातील 39 विधेयके राज्यसभेसमोर विचाराधीन आहेत. यातील 12 विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळाली आहे.

राज्यसभेची मंजुरी शिल्लक

w विवाहित मुस्लीम महिलांच्या अधिकारांच्या रक्षण करणारे विधेयक

w इंडियन मेडिकल कौन्सिल (दुरुस्ती) विधेयक

w अचल मालमत्ता अधिग्रहण (दुरुस्ती) विधेयक

w भूमी अधिग्रहण पुनर्वसन भरपाई तसेच मदत विधेयक (दुरुस्ती)

w व्हिसल ब्लोअर संरक्षण (दुरुस्ती) विधेयक

w मोटर वाहन (दुरुस्ती) विधेयक

w भ्रष्टाचार नियंत्रण (दुरुस्ती) विधेयक 2013

Related posts: