|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 56 गावांना शुद्धपाणी पुरवठा करणार !

56 गावांना शुद्धपाणी पुरवठा करणार ! 

प्रतिनिधी/   संकेश्वर

तहानलेल्या संकेश्वर शहराची 24 तास पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून तहान भागविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आगामीकाळात हुक्केरी मतदारसंघातील 56 गावांना शुद्धपाणी पुरवठा करणार, अशी ग्वाही आमदार उमेश कत्ती यांनी दिली. ते बुधवारी आयोजित केलेल्या 24 तास पाणी पुरवठा योजना कार्यान्वित व आपल्या 58 वा वाढदिवस या संयुक्त कार्यक्रमात बोलत होते.

 यावेळी ते पुढे म्हणाले, माजी मंत्री मल्हारगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी व संकेश्वर या शहरासाठी 24 तास पाणी पुरवठा योजना तत्कालीन भाजप सरकारच्या काळात मंजूर करून घेतली. ही योजना राज्यात प्रथमच संकेश्वरात कार्यान्वित करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. या योजनेतून 7500 नळधारकांना पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 संकेश्वर व हुक्केरी शहरात 24ƒ7 पाणी योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. गेल्याच आठवडाभरात योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर चाचपणी केली. अधिकृत नोंद असणाऱया 7500 नळधारकांना जलवाहिन्या जोडल्या आहेत. प्रत्येक नळाला मिटर बसविण्यात आले आहे. आज माझ्या 58 व्या वाढदिवसालाच 24ƒ7 पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली. हे माझे भाग्य समजतो, असे यावेळी आमदार कत्ती यांनी सांगितले.

                          काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती

 राज्यात ठिकठिकाणी 24ƒ7 पाणी योजनेचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरु आहे. पण कोठेही या योजनेचे काम पूर्ण झाले नाही. मात्र संकेश्वर व हुक्केरी या दोन ठिकाणी दर्जेदारपणे काम झाले आहे. सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी सरकारमधील मंत्री महोदयांना आमंत्रण देऊन विनंती केली. पण त्यापैकी एकाही मंत्री महोदयांनी या कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्याने ते आपणास योग्य वाटले नाही. परिणामी येथील काँग्रेसवाल्यानेच त्यांना येण्यास विरोध केला असावा, असे  त्यांनी स्पष्ट केले.

 प्रारंभी आमदार उमेश कत्ती यांनी नगरपालिका शुद्धपाणी केंद्रातील कळ दाबून पाणी योजनेचा शुभारंभ केला. तसेच नगरपालिका कार्यालयात इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर मराठा समाजाचे अध्यक्ष मधुकरराव नलवडे, चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष शशिकांत नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार रमेश कत्ती, विधान परिषद सदस्य अरुण शहापूरकर, आमदार पी. राजू, हिराशुगरचे चेअरमन आप्पासाहेब शिरकोळी, संगमचे चेअरमन राजेंद्र पाटील, नगराध्यक्षा धनश्री कोळेकर, उपाध्यक्ष आप्पासाहेब हेद्दूरशेट्टी, गजानन क्वळ्ळी, अमर नलवडे, श्रीकांत हतनुरे, संजय शिरकोळी उपस्थित होते.

भव्य नागरी सत्कार

आमदार उमेश कत्ती यांचा 58 व्या वाढदिवसानिमित्त संकेश्वरवासीयांनी गंगाकलश, शाल, श्रीफळ देऊन उमेश कत्ती यांचा भव्य नागरी सत्कार केला.  यावेळी ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायतीसह संघ-संस्थेच्या पदाधिकाऱयांना त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.