|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » वाहन क्षेत्रात उतरण्यास चिनी कंपन्या सज्ज

वाहन क्षेत्रात उतरण्यास चिनी कंपन्या सज्ज 

एसएआयसी मोटार करणार 5 हजार कोटीची गुंतवणूक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील स्मार्टफोन बाजारात वर्चस्व स्थापित केल्यानंतर चिनी कंपन्या आता वाहन क्षेत्रात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत. एसएआयसी मोटार ही चिनी कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपले मॉडेल सादर करणार आहे. कंपनी मॉरिस गॅरेजेस या ब्रॅन्ड नावाने 2019 मध्ये उतरणार असून 2025 पर्यंत 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कंपनीने यापूर्वी गुजरातमधील हलोल प्रकल्प खरेदी केला असून त्याची क्षमता 80 हजार ते 1 लाख वाहने प्रतिवर्षाची आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी कंपनीकडून गुंतवणूक करण्यात येईल. याचप्रमाणे बाजारपेठेत आपला हिस्सा मजबूत करण्याचाही प्रयत्न असणार आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीकडून 1 हजार कर्मचाऱयांची भरती करण्यात येईल. भविष्यात प्रकल्पाची क्षमता विस्तारल्याने ही आकडेवारी 2 हजारपर्यंत पोहोचेल.

गेली 15 ते 20 वर्षे भारतीय बाजारपेठेत असूनही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा एकूण हिस्सा 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. कंपनीने पाच ते सहा वर्षात 2 लाख युनिट्स विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे असे एमजी मोटार इंडियाचे अध्यक्ष राजीव छाबा यांनी सांगितले. 2019 च्या प्रिलनंतर कंपनीकडून पहिले एसयूव्ही मॉडेल दाखल करण्यात येईल. यानंतर प्रतिवर्षी एक नवीन मॉडेल बाजारात उतरविण्यात येइंल. 80 टक्के कच्चा माल स्थानिक पातळीवरील वापरण्यात येणार आहे. कंपनीकडून ईलेक्ट्रिक कारही बाजारात आणण्यात येईल. ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचण्यासाठी पुढील दोन वर्षात 200 विक्री आणि सेवा केंद्रे सुरू करण्यात येतील.