|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आधारचा डाटा पूर्णपणे सुरक्षित

आधारचा डाटा पूर्णपणे सुरक्षित 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारतीय नागरिकांचा आधारच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेला डाटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ‘युआयडीएआय’चे सीईओ अजयभूषण पांडेय यांनी केला आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपिठासमोर सुरक्षा तंत्र दाखवणारी पीपीटी सादर केली. केंद्र सरकारच्यावतीने त्यांनी हा सर्व डाटा सेंट्रल आयडेंटिटीज रिपॉजिटरीच्या 10 मीटर उंच आणि 4 मीटर रुंद भिंतीमध्ये सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

केंद्र सरकारची बाजू मांडताना ऍटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी आधार योजनेचे समर्थन केले आहे. आधारमुळे केवळ विविध शासकीय योजनांचा खऱया लाभार्थ्यांना लाभ मिळणार असे नाही तर यामुळे अनेक योजनांमध्ये पारदर्शकता येऊन भ्रष्टाचार संपुष्टात येण्यास आणि रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा केला आहे. प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचारामुळे खऱया लाभार्थीपर्यंत मदत पोहोचत नव्हती. परंतु आता ही परिस्थिती बदलली असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार पीपीटी सादर

आधारच्या वैधतेबाबत बुधवारी विविध याचिकांवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपिठाने आधारच्या डाटाबाबत सुरक्षा प्रबंधाविषयी पीपीटी सादर करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार गुरुवारी न्यायालयात पीपीटी देण्यात आली. सरन्यायाधीश मिश्रा यांनी प्रतिपक्षाला आता याविषयी प्रश्न, शंका असल्यास विचारण्यास सांगितले आहे.

अजयभूषण पांडेय यांनी दिली माहिती

युएआयडीएआयचे सीईओ अजयभूषण पांडे यांनी दुपारी अडीच वाजता संविधान खंडपिठासमोर प्रेझेंटेशन सुरु केले. अजयभूषण हे कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी आहेत. त्यांनी डाटा प्रेझेंटेशन आणि त्याच्या सुरक्षिततेबाबतच्या अन्य पैलूंची माहिती दिली. आधार कार्ड बनवताचा बायोमेट्रिक डाटा लिक होण्यापासून कसा वाचवला जातो, ते स्पष्ट केले. डाटा सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या तांत्रिक बाबींचीही माहिती दिली. 10 मीटर उंच आणि चार मीटर रुंद असणाऱया सेंट्रल आयडेंटिटी रिपॉजिटरीमध्ये तो सुरक्षित असल्याचेही स्पष्ट केले.

आधार डाटा लिकच्या शंका फोल : ऍटर्नी जनरल

दरम्यान, केंद्र सरकारच्यावतीने बोलताना ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले, आधारचा डाटा लिक होण्याबाबतच्या सर्व शंका फोल आहेत. सरकारने हा डाटा सुरक्षित ठेवण्याबाबत तांत्रिक आणि अन्य बाबींची योग्य तरतूद घेतली आहे. आधारच्या सक्तीमुळे शासकीय योजनांचा लाभ खऱया लाभार्थींपर्यंत पोहोचू लागला आहे. शिवाय या योजनांमधील भ्रष्टाचारासही आळा बसला असल्याचे सांगितले.

राजीव गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख

आधारच्या उपयोगितेबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वक्तव्याचाही दाखला दिला. केंद्र सरकार योजनेकरता 1 रुपया देत असेल तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांला अवघे 15 पैसे मिळतात. 85 पैसे मध्यल्यामध्येच हडपले जातात, असे त्यांनी म्हटले होते. परंतु आता आधारमुळे लाभार्थ्याला पूर्ण लाभ मिळू लागला आहे. तसेच यामुळे भ्रष्टाचार हळूहळू संपुष्टात येत असल्याचाही दावा त्यांनी केला.

Related posts: