|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी

इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी 

तिरंगी टी-20 मालिका : ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात

वृत्तसंस्था/ मुंबई

येथे सुरु असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेतील ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या विजयी घोडदौडीला इंग्लंडने लगाम घातला. शुक्रवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना इंग्लंडने विजयी आव्हान 17 षटकांत 2 गडय़ांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. 43 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह नाबाद 68 धावांची खेळी साकारणाऱया नताली स्केव्हियरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, रविवार (दि. 25) इंग्लंड महिला संघासमोर यजमान भारताचे आव्हान असणार आहे.

प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. डावातील चौथ्या षटकांत बेथ मुनी (4) धावबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. यानंतर, सलामीवीर एलिस हेलीही 31 धावा काढून बाद झाली. गार्डनर (28) फारशी मोठी खेळी साकारता आली नाही. इतर मधल्या फळीतील महिला फलंदाजांनीही निराशा केल्याने ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 8 बाद 149 धावापर्यंतच मजल मारता आली. कर्णधार रॅचेल हेन्सने एकाकी झुंज देताना 45 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 65 धावांची खेळी साकारल्याने ऑस्ट्रेलियाला दीडशेचा टप्पा गाठता आली.

प्रत्युतरादाखल खेळताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डॅनी वेट (18) व ब्रुनी स्मिथ (1) ही जोडी झटपट बाद झाली. यानंतर, बेमाँट (44 चेंडूत 8 चौकारासह नाबाद 58) व नताली स्केव्हियर (43 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह नाबाद 68) यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 17 व्या षटकांत विजय मिळवला. या जोडीने ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 8 बाद 149 (एलिस हेली 31, गार्डनर 28, हेन्स 65, जेनी गन 3/26, स्केव्हियर 2/29, हॅजेल 1/24).

इंग्लंड 17 षटकांत 2 बाद 150 (वेट 18, ब्रुनी स्मिथ 1, बेमाँट नाबाद 58, स्केव्हियर नाबाद 68, किमेन्स 1/12, स्कट 1/30).

Related posts: