|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शासकीय कार्यालयांतील काम रोखणार

शासकीय कार्यालयांतील काम रोखणार 

‘जनआक्रोश’ आंदोलनातील महिलांचा इशारा : आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यावर कडाडून टीका

आमची सहनशिलता आता संपली! : आठव्या दिवशीही जनआक्रोश सुरू

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग येथे आरोग्याच्या मागण्यांसाठी आरोग्याचा जनआक्रोश आंदोलन सुरू आहे. मात्र, आरोग्यमंत्री दीपक सावंत एक चकार शब्द बोलत नाहीत. दोन राज्यांचा प्रश्न आहे, म्हणून आठ दिवस शांत राहिलो. आता कोअरकमिटी राहिली बाजूला. आम्ही महिलांनी आंदोलनाची सूत्रे हातात घेतली असून येत्या काही तासात आपण रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार. एवढेच नव्हे तर दोडामार्ग तालुक्यात एकही शासकीय कार्यालयाचे काम करू देणार नाही, असा संतप्त इशारा ‘आरोग्याचा जनआक्रोश’मध्ये सहभागी महिलांनी दिला. ‘आठ रुपयांचा कढीपत्ता… सरकार व आरोग्यमंत्री झाले बेपत्ता’ अशा जोरदार घोषणा महिलांनी बुधवारी दिल्या. बुधवारी दुपारच्या सत्रात एका आंदोलकाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तात्काळ दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलांनी ओदालनस्थळी खास पत्रकार परिषदेचे आयोजन करून ही माहिती दिली. यावेळी संगीता देसाई, साक्षी नाईक, मनीषा नाईक आदींनी पत्रकार परिषदेत आपल्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, गेल्या आठ दिवसांपासून हजारोंच्या संख्येने महिला तहान-भूक, कामधंदा विसरून आरोग्याच्या महत्त्वाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दोन राज्यांचा प्रश्न आहे. वेळ लागेल, असे कारण प्रत्येक प्रतिनिधीकडून पुढे केले जाते. मात्र किती काळ शांत बसायचे, याला मर्यादा आहेत. सर्वसामान्यांच्या मतांवर आरोग्यमंत्री निवडून आले. मात्र त्या जनतेच्या समस्येंचा त्यांना विसर पडल्याचे चित्र आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री आपण निर्णयावर ठाम असल्याचे ठणकावून सांगतात. मात्र आपले आरोग्यमंत्री एक शब्दही बोलत नाही. उन्हात बसलेल्या महिला, ग्रामस्थ यांची त्यांना चिंता नसेल तर महिलांची शक्ती काय असते? हे महिला दाखवून देतील. एकीकडे सिंधुदुर्ग प्रगत जिल्हा म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो. मात्र आरोग्याच्या प्रश्नावर ठाण मांडून आंदोलन करताना याची लाज वाटते. आता हजारो महिला रस्त्यावर येऊन आंदोलन छेडतील. शिवाय दोडामार्गात एकही शासकीय कार्यालय सुरू करू देणार नाही, अशा इशारा देत या सर्वाला आरोग्यमंत्री दीपक सावंत जबाबदार असतील, असेही म्हटले आहे.

श्रीपाद नाईक यांचे लक्ष वेधले

खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. गोव्याने परराज्यातील रुग्णांना शुल्क आकारण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत महाराष्ट्राच्या जनतेतून व्यक्त होत असलेली नाराजी स्पष्ट केली. यावेळी नाईक यांनी आपली ही नाराजी गोवा सरकारपर्यंत पोहचवून चर्चेद्वारे निश्चितच तोडगा काढू, असे आश्वासन दिले, अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली. या संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळ चर्चा करेल, असेही धुरी म्हणाले.

शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लक्ष्मण आयनोडकर, राजेश गवस उपस्थित होते. धुरी म्हणाले, केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशीही खासदार राऊत चर्चा करणार असल्याचे धुरी म्हणाले. बुधवारी सायंकाळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

पाठिंबा नको, सहभागी व्हा!

दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असणारे आरोग्याचा जनआक्रोश आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच होते. ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कोअर कमिटेने दिला आहे.

बांबोळी येथे निःशुल्क सेवा मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसह आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे उपोषणात रुपांतर झाले. त्यामुळे मंगळवारी उपोषण सुरूच होते. यावेळी ज्या-ज्या नेत्यांनी आश्वासने दिली, ती पाळावीत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावे अन्यथा आल्यास आंदोलनात पूर्णवेळ सहभागी व्हावी, असे आंदोलक ग्रामस्थांनी सांगितले.

28 मार्चच्या डेडलाईनचे काय?

बहुतांशी राजकीय नेत्यांनी 28 मार्चपर्यंत हा प्रश्न निकाली काढू, असे आंदोलकांना आश्वासित केले होते. त्यामुळे उद्या 28 तारीखला निर्णय मिळेल काय? याकडे लक्ष लागले आहे. शिवाय निर्णय न मिळाल्यास आश्वासन देणारे पदाधिकारी कोणती प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकता दोडामार्गवासीयांना आहे. दरम्यान, मंगळवारी आरपीआय राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबालकर, मधु मोहिते, रमाकांत जाधव यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे.