|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मार्जी प्रॉफेट : एक आगळी जीवशास्त्रज्ञ

मार्जी प्रॉफेट : एक आगळी जीवशास्त्रज्ञ 

अमेरिकेत जेव्हा एखाद्या शास्त्रज्ञाला मॅक आर्थर पुरस्कार मिळतो तेव्हा त्या शास्त्रज्ञाकडं नोबेल पुरस्कार विजेत्याकडं बघावं तसं आणि तितक्याच आदरानं बघितलं जातं. मॅक ऑर्थर पुरस्कार हा चाकोरीबाहेर पडून संशोधन करणाऱया उगवत्या शास्त्रज्ञांना दिला जातो. मार्जी प्रॉफेटला 1993 साली हा पुरस्कार मिळाला. त्याआधी तिला लोक जेव्हा ‘़तू काय करतेस?’ असा प्रश्न विचारीत असत, त्यावेळी ती ‘उनाडक्या’ असं उत्तर देत असे. याचं कारण ‘मी काय करायचं, याचा विचार करत्येय’ हे उत्तर दिलं तर ‘ही वाया गेली’ अशा अर्थाचा दृष्टीक्षेप टाकून विचारणारा निघून जायचा. ‘उनाडक्या’ हे उत्तर त्यामानानं बरं होतं, असं मार्जी म्हणते. मॅक आर्थर पुरस्कार मिळाल्यानंतर लोक विचारू लागले, ‘आता तू पीएच डी कधी करणार?’ अशा प्रश्नकर्त्यांना ती विचारायची ‘कशासाठी?’

‘मार्जी चुकीच्या काळात जन्माला आली,’ असं तिचे प्रशंसक म्हणतात. दोन शतकापूर्वी ती ‘निसर्ग तत्त्वज्ञ’ म्हणून गाजली असती. प्रत्येक गोष्टीचं कारण शोधण्यासाठी तिच्या मुळाशी जाण्याची जिद्द बाळगून मार्जी प्रॉफेट काम करते. तिनं हार्वर्ड आणि बर्कले विद्यापीठातून दोन अगदी वेगवेगळय़ा एकमेकांशी संबंध नसलेल्या विषयातून बी. ए. ची पदवी मिळवली. वडील पदार्थ वैज्ञानिक आणि आई अभियंता असल्यामुळं तिनं हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेताना विज्ञान शाखा टाळून ‘राजकीय तत्त्वज्ञान’ हा विषय निवडला. त्यात पदवी मिळवल्यानंतर ती जर्मनीमध्ये ‘कंप्युटर प्रोग्रॅमर’ म्हणून काम करू लागली. तिथं आपल्या पहिल्या पदवीचा निरर्थकपणा तिच्या लक्षात आला. मग अमेरिकेत  परतल्यावर ती बर्कले इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात पदार्थविज्ञान शिकू लागली. वेट्रेस, बार टेंडर अशा नोकऱया करत करत ती शिकत होती. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तिनं असंख्य वेगवेगळय़ा अशैक्षणिक नोकऱया केल्या. जेव्हा ती घरी असे त्यावेळी आणि अभ्यास करीत नसे त्यावेळी ती विविध गोष्टींचा विचार करीत असे.

मार्जीचं घर म्हणजे चिमण्या आणि इतर पाखरं यांच्याबरोबर खारीचं घर असं म्हणावं लागतं. माणसांना वेगवेगळय़ा गोष्टींची ऍलर्जी का असते. फक्त मानवी स्त्रियांनाच मासिक पाळी का असते. मानवात केव्हाही गर्भधारणा का होते, यात उत्क्रांतीचा वाटा किती अशा अनेक प्रश्नांमुळे ती अस्वस्थ असे. यामुळेच 1993 साली या पस्तीस वर्षीय संशोधक स्त्राrला अडीच लाख डॉलरची मॅकार्थर शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा पारंपरिक विचाराच्या शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं होतं.

प्रॉफेटला स्त्रियांच्या तीन शारीरिक गुणधर्मांचा उलगडा उत्क्रांती प्रक्रियेच्या साहाय्यानं करता येईल याची खात्री वाटते. तिचे विचार ग्राहय़ धरले तर या सर्व प्रकारांवर औषधी उपाय योजना करणं शक्य आहे असं मानता येतं. यातला पहिला विचार म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात आणि काही वेळा नंतरही स्त्रियांना ज्या कोरडय़ा उलटय़ा होतात आणि त्याबरोबर इतरही त्रास होतात, त्यामागे निसर्गाची योजना असते. ज्या अन्न सेवनामुळं वाढणाऱया गर्भाला त्रास होईल किंवा जे अन्न गर्भाच्या दृष्टीनं घातक ठरेल ते अन्न स्त्रियांनी खाऊ नये आणि खाल्लंच तर ते लगेच बाहेर टाकलं जातं, हा हेतू त्या त्रासामागं असतो. आता हा विचार वैद्यकीय समुदायानं स्वीकारला आहे. याच बरोबर आपल्याला ज्या ऍलर्जी असतात त्याही वनस्पतीमध्ये आणि वातावरणात जे विषारी पदार्थ असतात, त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून कार्यरत असतात, असं प्रॉफेटचं म्हणणं आहे. यासंबंधीचा तिचा शोधनिबंध तिच्या शोध कार्याच्या सुरुवातीसच छापून आला होता. 1991-92 मध्ये तिनं एक नवा विचार मांडला. गर्भाशयात शुक्रजंतूंबरोबर जे रोगकारक पदार्थ आणि काही वेळा सूक्ष्मजीव जातात, त्यांचा निचरा व्हावा, हे मासिक पाळीचे प्रयोजन असते. खरं तर मार्जीचा आणि उत्क्रांतीवादी जीवशास्त्राचा काही शैक्षणिक निमित्तानं संबंध आलेला नव्हता. पण त्या विषयात रस वाटू लागल्यानंतर मार्जीनं फक्त उत्क्रांतीवादी जीवशास्त्रावरची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. एकदा योगायोगानं त्यांच्याच घरातील काही गर्भारस्त्रिया एकत्र जमल्या होत्या. त्या चार-पाच जणींच्या बोलण्यात ‘मॉर्निंग सिकनेस’ हाच विषय होता. त्याबरोबर मार्जीच्या डोक्यात विचारचक्रे फिरू लागली. एक लाख वर्षापूर्वीच्या आदिमानवाच्या स्त्रियांना असा त्रास होत होता का? जर होत असेल तर त्या स्त्रिया काही विशिष्ट खाद्यपदार्थ खायचं टाळून या आजाराची तीव्रता कमी करत होत्या का? हा विचार मनात आल्यानंतर मार्जीनं त्या संबंधींचे विचार कागदावर उतरवून काढले. पण असे अंतःस्फूर्त विचार म्हणजे शास्त्राrय पुरावा नव्हे, याची मार्जीला जाणीव होतीच. मग तिनं आदिमानवाच्या जीवनशैलीचा अभ्यास सुरू केला. त्यातून आवश्यक ते पुरावे मिळविल्यानंतर तिनं जो शोधनिबंध लिहिला तो एका प्रमुख मानवशास्त्र संशोधन पत्रिकेनं प्रसिद्ध केला होता. त्यानंतर हीच कल्पना अधिक पुराव्यांसह तिनं सविस्तर लिहिली. ती 93 साली सप्टेंबरच्या ‘द क्वार्टर्ली रिव्हय़ू ऑफ बायॉलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाली.

मार्जीचं बालपण कॅलिफोर्नियातील मॅनहॅटनबीच या सॅन फ्रान्सिस्कोच्या एका उपनगरात गेलं. हे उपनगर विमान आणि अवकाश संशोधकांची वस्ती म्हणून प्रसिद्ध आहे. ही सर्व मंडळी रोज सकाळी कचेरीत जाताना आणि संध्याकाळी मलूल आणि निस्तेज होऊन परतताना मार्जी रोज बघत असत. त्यामुळं वयाच्या सातव्या वर्षीच ‘असं कंटाळवाणं आयुष्य कशासाठी जगायचं’ हा विचार तिच्या मनात प्रथम आला. हार्वर्ड विद्यापीठात राजकीय तत्त्वज्ञान शिकताना मेंदूचा वापर कसा करावा, हे तिला कळू लागलं, असं ती म्हणते. ‘तत्त्वज्ञानाचा अभ्यासक वेगवेगळय़ा असंबंधित कल्पनांचा विचार करत खूप खोलवर शिरतो आणि बरेचदा या कल्पनांचा परस्पर संबंध असल्याचं त्याच्या लक्षात येतं असं तिच्या लक्षात आलं. पुढं जर्मनीत असताना आपल्या पुस्तकी ज्ञानाचा आणि राजकीय वास्तवाचा काहीच संबंध नाही, हे तिच्या लक्षात आलं. पदार्थ विज्ञानात तिनं पदवी मिळवली खरी, पण त्यात बऱयाच गोष्टी अमूर्त असतात, तत्त्वज्ञान आणि पदार्थ विज्ञान या दोन्ही विषयांच्या अभ्यासात तिला मानसिक समाधान मिळेना. त्याचबरोबर या दोन पदव्यांचा तिला नोकरी मिळवायलाही उपयोग होईना. तेव्हा तिनं मग स्वतःला आवडेल त्या विषयाचं वाचन आणि मिळेल ते काम करायला सुरुवात केली.

ब्रूस एम्स या विषतज्ञानं मार्जीला हेरलं. त्याला विक्षिप्त माणसं गोळा करायची सवय आहे, असं म्हटलं जातं. त्यानं मार्जीचा ऍलर्जीसंबंधीचा शोधनिबंध वाचला होता. मार्जीशी त्यानं संपर्क साधला आणि मार्जीला अर्धवेळ नोकरी देऊ केली. एम्सच्या प्रयोगशाळेत मार्जी आता दिवसातले चार तास काम करू लागली. मॅक अर्थर शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर मार्जीनं काही दिवस पुस्तकी संशोधनात घालवण्याचे ठरवले. गर्भधारणेनंतर अन्नासंबंधी वाटणारी घृणा या विषयावर संशोधन करता करता मार्जीनं सामान्य माणसाला सहज समजेल अशा भाषेत, ‘प्रोटेक्टिंग युवर एंब्रयो’ हे पुस्तक लिहिलं. आपल्या शरीराचा पर्यावरणातील अपायकारक वस्तू आणि रोगकारकांशी सातत्याने झगडा चालू असतो, असा तिचा दावा आहे. याचं कारण उत्क्रांती प्रक्रियेमध्ये आपण निर्माण झाला. आजच्या स्थितीला पोहोचला. आपण ज्या काळात उत्क्रांत होत होतो त्याच काळात अब्जावधी इतर सजीवही उत्क्रांत होत होते. सूक्ष्म जीव आणि विषाणू यांनीही आपापली उत्क्रांती बऱयाच मोठय़ा प्रमाणता साधलेली होतीच. ज्याप्रमाणे माणूस पर्यावरणाचा त्याच्या फायद्यासाठी प्रयत्न करतो आहे, त्याच प्रकारे सूक्ष्मजीव आणि विषाणू माणसाचा त्यांच्या फायद्याकरिता उपयोग करून घेत असतात.