|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग चौपदरीकरणात स्थानिक रोजगारापासून दुरच!

महामार्ग चौपदरीकरणात स्थानिक रोजगारापासून दुरच! 

राजू चव्हाण /खेड :

मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. चौपदरीकरणासाठी 22 कशेडी ते परशुराम दरम्यान 22 गावांतील 124 हेक्टर जागा संपादित झाली आहे. या बाधित जागा मालकांना मोबदल्याचे वाटपदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र चौपदरीकरणाच्या कामात स्थानिक रोजगारापासून दुरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. या कामासाठी अवघी यंत्रणा चौपदरीकरणाचा ठेका मिळालेल्या कल्याण टोलवेज कंपनीचीच असून कामगारदेखील कंपनीनेच नियुक्त केले आहेत. या रोजगार प्रश्नी लोकप्रतिनिधींसह सारेच गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

चौपदरीकरणाच्या प्रक्रियेसाठी सर्वप्रथम जागा संपादित केल्यानंतर जागा हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कशेडी ते परशुराम दरम्यान भूसंपादन प्रक्रियेत 8 हजार 214 जमीन मालकांचा समावेश असून 1 हजार 131जणांची सातबारा उतारावर नोंद आहे. खवटी ते परशुराम दरम्यान अंदाजे 150 बांधकामे बाधित झाली असून सर्वाधिक बांधकामे भरणे परिसरातील आहेत. चौपदरीकरणात बाधित झालेल्या शेतकऱयांच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यापोटी तब्बल 411 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील बहुतांश मोबदल्याचे वाटप करण्यात आले असून उर्वरित जागा मालक भावकीच्या कोलदांडय़ात अडकले आहेत.

सद्यस्थितीत महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने कमालीचा वेग घेतला असून सपाटीकरणही जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. या सपाटीकरणासाठी कल्याण टोलवेज कंपनीचीच अद्ययावत यंत्रणा तैनात करण्यात आली असून यासाठी लागणारे कामगारदेखील कंपनीनेच परगावातून आणले आहेत. यामुळे सपाटीकरणाच्या कामात स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी शक्यता असतानाच या शक्यतेवर पाणीच फेरले आहे. याशिवाय चौपदरीकरणाच्या कामासाठी लागणाऱया किरकोळ बाबीतही स्थानिकांना सामावून घेतलेले दिसून येत नाही.

सपाटीकरण करताना महामार्गावरील वृक्षतोडीचे काम हाती घेण्यात आले. या वृक्षतोडीच्या कामातही स्थानिकांना बगल देण्यात आली आहे. धामणदेवीपर्यंत तब्बल 25 हजार वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. वृक्षतोडीसाठी स्थानिकांचा विचार होईल, ही आशादेखील धुळीसच मिळालेली आहे. चौपदरीकरणाच्या खडीकरणासाठी महामार्गावर खडी व डबरचे ढीग तयार करून ठेवले आहेत. ही खडी व डबरदेखील कंपनीने महाड येथूनच आणले आहे. याशिवाय खडीकरणानंतर मजबुतीकरणासाठी टँकरद्वारे पाणी मारले जाते. हे पाण्याचे टँकरदेखील कंपनीनेच तैनात केले आहेत.

Related posts: