|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » चिंकारा शिकार प्रकरण; माजी राज्यमंत्री यांच्या विरोधातील खटला प्रलंबीत

चिंकारा शिकार प्रकरण; माजी राज्यमंत्री यांच्या विरोधातील खटला प्रलंबीत 

ऑनलाईन टीम / पुणे :

दोन चिंकारांची हत्या करून मांस खाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात चालू असलेला खटला प्रलंबित आहे. मागील चार वर्षापासून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सासवड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची प्रक्रिया थांबलेली आहे.

14 जून 2008 च्या मध्यरात्री सोमेश्वरनगरमध्ये तीन आलिशान गाडय़ांतून आलेल्यांनी हरणाची शिकार केल्याची तक्रार चौधरीवाडी येथील ग्रामस्थांनी दिली होती. तपासानंतर लाल दिव्याची ती गाडी राज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अत्राम यांच्यासह इतर आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि वन कायदा 1926 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा सरकारी वकील उज्जवला पवार यांनी सांगितले की, सासवडचे तत्कालीन विभागीय वन अधिकारी एस. जी. धुमाळ या प्रकरणात तपास अधिकारी होते. त्यांनी आत्राम यांच्यासह सर्व आरोपींचे जबाब नोंदवले होते. या प्रकरणात दिलेल्या पुराव्यांवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला होता. या संदर्भात स्पष्टीकरणासाठी 2014 मध्ये हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. तेव्हापासून उच्च न्यायालयाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत पुढील जबाब घेता येणार नाहीत.

काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला गुरूवारी जोधपूर न्यायालयाने पाच वर्षे शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंदे, नीलम या कलाकारांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे बारामती येथे झालेले चिंकारा शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आरोपींचे जबाब पुरावे म्हणून ग्राहय़ धरता येतील की नाही, यावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या वादामुळे सुनावणी थांबलेली आहे.

 

Related posts: