|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रणरणत्या उन्हात रिक्षा व्यवसायिकांचा मोर्चाद्वारे हुंकार

रणरणत्या उन्हात रिक्षा व्यवसायिकांचा मोर्चाद्वारे हुंकार 

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारों रिक्षा व्यवसायिक

दापोलीतून सुरु झालेल्या पदयात्रेला जिल्हाभरातून साथ

तातडीने मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हय़ातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी रत्नागिरीत हुंकार उमटला. रिक्षा चालक-मालक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दापोलीतील रिक्षा चालकांची पदयात्रा रत्नागिरीत दाखल झाला. या आंदोलनाला जिल्हाभरातील हजारों रिक्षा चालकांनी पाठींबा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयावर या पदयात्रेद्वारे भव्य मोर्चा नेत प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.

2013 पासून नाही रिक्षा भाडेवाढ

महागाईचा उच्चांक, इंधनाचे वाढते दर, अवैध प्रवासी वाहतूक या साऱया समस्या रिक्षाचालकांना भेडसावत आहेत. मात्र रिक्षा चालक-मालकांच्या मागण्यांचा गेल्या 6 वर्षात शासनस्तरावरून कोणताही विचार झालेला नाही. 2013 नंतर रिक्षा भाडेवाढ झालेली नाही. पेट्रोल 82 रु. व ऑईल 280 रुपयांवर पोचलेले असताना रिक्षा भाडय़ात एकाही रुपयांची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या व्यवसायासमोर संकट उभे आहे. रिक्षा व्यवसायाच्या समस्येबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे, आंदोलनाद्वारे टाहो फोडूनही शासनाला कसलीच कदर नसल्याची खंत या व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

दापोलीतून सुरू झालेल्या पदयात्रेला हजारोंचा पाठींबा

रिक्षा चालकांमधील परिवहन विभागाच्या धोरणांविरोधात दापोलीतील 19 रिक्षा चालकांनी सुरू केलेली पदयात्रा सोमवारी रत्नागिरीत दाखल झाली. त्यांना पाठींबा म्हणून जिल्हाभरातील रिक्षा चालक-मालक रस्त्यावर उतरले. साळवीस्टॉप येथून या व्यवसायिकांच्या पदयात्रा मोर्चाला प्रारंभ झाला. रणरणत्या उन्हातून ही पदयात्रा घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी धडकली.

जिल्हा प्रशासनाकडे मांडली व्यवसायाची व्यथा

दापोलीतील रिक्षा व्यवसायिकांच्या लाक्षणिक उपोषणाला सर्व रिक्षा व्यवसायिकांची साथ लाभली. मोर्चेकरींच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. यामध्ये रिक्षा संघटनेचे नेते प्रताप भाटकर, संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले (चिपळूण), केतन शिंदे (दापोली), सुनील भालेकर (खेड), महेश चव्हाण (सावर्डा), सत्यप्रकाश चव्हाण ( गुहागर), लवू कांबळे (लांजा), संतोष सातोसे (राजापूर), अभिजित गुरव (राजापूर), राजेंद्र घाग (रत्नागिरी), आप्पा सकपाळ (चिपळूण) सहभागी होते.

ब्रेक टेस्टींगसाठी रिक्षा व्यवसायिकांची ससेहोलपट

अवैध प्रवासी वाहतूक पूर्णपण बंद करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर येथील रिक्षा व्यवसायिकांनाही ब्रेक टेस्टींगसाठी हातखंबा येथे यावे लागते. या तालुक्यांसाठी सुरू केलेली सुविधा महिनाभरातच बंद केल्यामुळे पुन्हा हातखंबा येथे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ब्रेक टेस्टींग ट्रकची व्यवस्था होईपर्यंत प्रत्येक तालुक्यात पूर्वीप्रमाणेच पासींग चालू करावे अशीही त्यांची मागणी आहे.

नोकरीधारकांची करा परमीट रद्द

सेवानिवृत्त पेन्शनधारकांना नवीन परमिट देणे तात्काळ बंद करावे. जे परमीट धारक नोकरीत आहेत त्यांची परमीट रद्द करावी. रिक्षा परमीटधारकांसाठी महामंडळ स्थापन करावे. परमीटधारकाला 25 वर्षे काम केल्यानंतर पेन्शन योजना चालू करावी, पीएफ चालू करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक अयुब खान आदी उपस्थित होते.

पोटावर लाथ मारलात तर याद राखा…

रिक्षा चालकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे. सर्व अटी, कागदपत्रांची प्रामाणिकपणे पूर्तता करायची. त्याचवेळी 15 वर्षात एकदाच पासिंग करणारे वडापवाले आयुष्यभर कमवतात, त्यांचा टॅक्स, पीयुसी, पासिंग, इन्शुरन्स बघितला जात नाही. मात्र आपल्या दिड लाखाच्या रिक्षावर निर्बंध लादले जात आहेत. आमच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा आक्रमक आंदोलन हाती घेऊ असा इशारा संघर्ष समितीचे नेते राजू खेतले यांनी यावेळी दिला.

चिपळुण खेड मध्ये रिक्षा व्यावसायिकांचा यशस्वी बंद

सुरु असलेले वडाप बंद करावे, प्रत्येक तालुक्यात आरटीओ पॅम्प घ्यावे, वाढीव स्वरुपातील कराची रक्कम कमी करावी यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी रिक्षा व्यावसायिकांनी लढा उभारला आहे. यासाठी येथील रिक्षा चालकांनी सोमवारी रिक्षा बंद आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढला. यामुळे शहरात कायम गजबजलेले रिक्षा थांबे ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या बंदमुळे शहरातील कायम गजबजलेले महत्वाचे चिंचनाका, एस. टी. बसस्थानक, जुना बसस्थानक, भेंडी नाका, बहाद्दरशेख नाका, काविळतळी, रावतळे, पाग, नगर परिषद, हायवे परिसर येथील रिक्षा थांबे ओस पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, या रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. यात वयोवृध्दांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. खेड-भरणे मार्गावर व खेड ते रेल्वे स्थानक मार्गावर रिक्षा व्यावसायिकांची सतत वर्दळ सुरू असते. मात्र याठिकाणचे सर्व रिक्षा व्यावसायीक बंदमध्ये सहभागी झाल्याने प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. प्रसंगी प्रवाशांना पायपीट करून इच्छित स्थळ गाठावे लागले. काही प्रवाशांनी एस.टी. बसचा आधार घेतला.

अवैद्य प्रवासी वाहतूकीविरूध्द पोलीस विभाग, परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यापुढे अधिक कडक तपासणी मोहिम राबवण्यात येईल, तसेच जिल्हय़ातील पोलीस स्थानक यांना कारवाई बाबत तात्काळ निर्देश दिले जातील असे उपप्रादेशिक परिवहन विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पत्र दापोली रिक्ष्घ चालक-मालक संघटनेला दिले आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले.

Related posts: