|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शिवसेनेची म्हाडावर बोळवण

शिवसेनेची म्हाडावर बोळवण 

सिडको महामंडळ भाजपने स्वत:कडे ठेवले

महामंडळांवरील नेमणुका लवकरच होणार

महामंडळ वाटपाचा वाद मिटला

मुंबई / प्रतिनिधी

सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे. राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेचे समजले जाणारे सिडको महामंडळ भाजपने स्वत:कडे ठेवून घेतले आहे. याशिवाय महत्त्वाची चारही वैधानिक विकास मंडळे भाजपच्या ताब्यात राहणार आहेत.

शिवसेना आणि भाजपमधील वादामुळे गेल्या साडेतीन वर्षापासून सरकारी महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. दोन्ही पक्षात सिडकोवरून वाद होता. सिडको महामंडळावर दोन्ही पक्षांनी दावा सांगितला होता. शिवसेनेकडून सिडकोचे अध्यक्ष म्हणून महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नावाची औपचारिक घोषणा करणे बाकी होते. मात्र, भाजपने सिडको सोडण्यास नकार दिल्याने शिवसेनेला म्हाडावर समाधान मानावे लागले. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून काही अपवाद वगळता अनेक महामंडळांवरील नियुक्त्यांना मुहूर्त मिळत नव्हता. भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार (भाजप 67 टक्के, शिवसेना 33 टक्के) महामंडळाच्या वाटपावरून बराच घोळ होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर सरकारने महामंडळावरील नियुक्त्या मार्गी लावण्याचे ठरवले आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात महत्त्वाच्या महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या घोषणा टप्प्याटप्प्याने करण्यात येतील, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली.

गेल्या साडेतीन वर्षात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, शिर्डी, सिध्दीविनायक, पंढरपूर तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ आदी मंडळांवर अध्यक्ष आणि सदस्य गेले. तर, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, राज्य महामार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ, मत्स्योद्योग महामंडळ, उद्योग विकास महामंडळ, कृषि उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आदी महामंडळांची सूत्रे संबधित खात्याच्या मंत्र्यांकडे आहेत. यापार्श्वभूमीवर महामंडळांवर कोणाची वर्णी लागते याकडे भाजप आणि शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

नेमणुकीच्या प्रतिक्षेत असलेली महत्त्वाची महामंडळे

सिडको, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महिला आर्थिक विकास, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, राज्य हातमाग महामंडळ, पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी आणि शेळी विकास महामंडळ, लघुद्योग विकास महामंडळ, हाफकीन, चर्मोद्योग विकास, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, राज्य खनिकर्म, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, राज्य अल्पसंख्याक आयोग