|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मोदींच्या हत्येचा कट रचणाऱयाला अटक

मोदींच्या हत्येचा कट रचणाऱयाला अटक 

कोईम्बतूर / वृत्तसंस्था :

तामिळनाडू पोलिसांनी कोईम्बतूर येथील मोहम्मद रफीक नावाच्या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. न्यायालयाने रफीकला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रफीक हा 1998 च्या कोईम्बतूर साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरला होता.

मोदींना मारण्याचा कट रचण्याची सूचना करतानाची एका व्यक्तीची ध्वनिफीत समोर आल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ध्वनिफितीतील आवाज रफीकचा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

रफीक एका व्यावसायिकासोबत पैशांच्या देवाणघेवाणीबद्दल बोलत होता, अचानक त्याने धमकीवजा स्वरुपात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपविण्याची योजना तयार केल्याचे सांगितले. 1998 मध्ये लालकृष्ण अडवाणी कोईम्बतूर येथे आले असताना आपणच बॉम्ब पेरल्याचेही त्याने व्यावसायिकासोबतच्या संभाषणात मान्य केले.

माझ्यावर अनेक खटले आहेत, 100 पेक्षा अधिक वाहनांना नुकसान पोहोचविल्याचे रफीकने व्यावसायिकाला सांगितल्याचे ध्वनिफितीत ऐकू येते. व्यावसायिकाने ही ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी रफीकला ताब्यात घेतले. कोईम्बतूर साखळी स्फोटाप्रकरणी रफिकने शिक्षा भोगली असून या स्फोटांमध्ये 58 जणांना जीव गमवावा लागला होता.

Related posts: