|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » ‘राम मंदीर प्रकरणातील निकाल हिंदु विरोधी आल्यास आंदोलन करू’-विष्णू कोकजे

‘राम मंदीर प्रकरणातील निकाल हिंदु विरोधी आल्यास आंदोलन करू’-विष्णू कोकजे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येमधील राम मंदीर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल हिंदू विरोधी दिल्यास देशभर आंदोलन होतील, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले आहे.

राम मंदीराप्रकरणी न्यायालयाने भावना दुखावणारा निकाल दिल्यास, अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याचा कायदा संमत करण्यासाठी देशभरातील हिंदू आंदोलने करून त्यांच्या खासदारांवर दबाव आणतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच कोकजे यांनी हरिद्वारला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना असे विधान केले. सर्वोच्च न्यायालयात असलेला राम जन्मभूमी प्रकरणाचा खटला लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षा कोकजे यांनी व्यक्त केली. ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोटय़वधी हिंदूंच्या अपेक्षेप्रमाणे लागेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेच्या कायदेतज्ञांना वाटतो,’ असे कोकजे यांनी म्हटले. न्यायालयाचा निकाल श्रद्धेच्या विरोधात गेल्यास देशभरातील हिंदू आंदोलने सुरू करतील आणि आपापल्या खासदारांवर दबाव आणून त्यांना अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी कायदा संमत करायला लावतील, असे कोकजे यांनी म्हटले. कोकजे यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. सामाजिक शांतता, गोहत्येविरोधातील जनजागृती, राम मंदिराची उभारणी, नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी विश्व हिंदू परिषद यापुढेही काम करत राहील, असे कोकजे यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेला संकुचित म्हणणारे आता मंदिरात जाऊन पूजा करत आहेत, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली. आम्ही कित्येक वर्षांपासून करत असलेल्या कामाचा हा परिणाम असल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारने गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा का मंजूर केला नाही, असा प्रश्न कोकजे यांना पत्रकारांनी विचारला. मात्र त्यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले. सर्व गोष्टी सरकार करू शकत नाही, असे कोकजे यांनी म्हटले.

Related posts: