पुण्याच्या रणरागिनींचे साताऱयात स्वागत

प्रतिनिधी/ सातारा
निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा, महिलांची प्रगती व संरक्षणाकडे लक्ष द्या, चांगले शिक्षण द्या. या संदेशाचा प्रसार करण्यासाठी पुण्यातील दोन रणरागिणांनी सुरु केलेली सायकलसफर आज साताऱयात आली, तेव्हा मोठय़ा उत्साहात जायंटस् ग्रुप ऑफ सातारा व संलग्न संस्थांनी त्यांचे शिवतीर्थावर स्वागत केले.
उत्कर्षा सुनील बरभाई व वैष्णवी विजय भुजबळ या पुण्यातील दोन रणरागिणी पुणे, चेन्नई, कोलकता, दिल्ली, मुंबई अशी सुवर्ण सायकल सफर करीत आहेत. या सफरीमध्ये त्या निसर्ग व पृथ्वी वाचवा, महिलांच्या प्रगतीकडे व त्यांना निर्भय होण्यासाठी प्रयत्न करा, सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहेत. दोघी मिळून जवळजवळ 6500 किमी चा टप्पा पार करणार आहेत.
बुधवारी त्यांचे साताऱयात आगमन झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता पोवई नाक्यावर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास त्यांनी अभिवादन केले. यावेळी ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर, बालाजी ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, जायंट्स ग्रुप ऑफ साताराचे अध्यक्ष ऍड. सन्मान अयाचित, जायंट्स वेलफेअर फौंडेशन युनिटचे डायरेक्टर ऍड. नितीन शिंगटे, अमोल सणस, कार्यवाह प्रशांत चरेगावकर व सर्व सदस्यांनी या दोघांचे उत्साहात स्वागत करुन पुढील सफरीस शुभेच्छा व्यक्त केल्या.