|Monday, January 27, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा आजपासून

पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा आजपासून 

सोची

: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून रशियाच्या दौऱयावर जाणार आहेत.  त्यांचा हा पहिला रशिया दौरा नसला तरीही अन्य दौऱयांपेक्षा याचे स्वरुप वेगळे असेल. राष्ट्रपतिपदी पुन्हा निवड झाल्याच्या केवळ 2 आठवडय़ांच्या आत ब्लादिमीर पुतीन यांनी मोदींना निमंत्रण दिल्याची माहिती भारतीय राजदूत पंकज सारन यांनी दिली.

मोदी आणि पुतीन यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होईल.  द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. परस्परांची अर्थव्यवस्था आणि प्रभाव वाढविण्यासाठी द्विपक्षीय सहकार्यावर दोन्ही नेते चर्चा करणार असल्याची माहिती सारन यांनी दिली.

 पंतप्रधान मोदी रशियाच्या सोची शहरात 21 मे रोजी पुतीन यांच्यासोबत अनौपचारिक भेटीसाठी पोहोचतील. या दौऱयापूर्वी  मोदींनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत देखील अशाप्रकारचीच अनौपचारिक चर्चा केली होती.

द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चेसोबतच पंतप्रधान मोदी आणि पुतीन इराण अणुकरारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर देखील चर्चा करतील. भारत आणि रशिया दोन्ही देश दहशतवादाने पीडित असल्याने इस्लामिक स्टेटचा धोका आणि अफगाण-सीरियाच्या स्थितीवर देखील चर्चा होणार असल्याचे सारन यांनी सांगितले.

दोन्ही देशांदरम्यान आण्विक सहकार्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते. बांगलादेशात भारत रुपपूर आण्विक प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पासाठी रशिया आणि भारताचे तज्ञ एकत्र येतील अशी अपेक्षा असल्याचे सारन म्हणाले. मोदींचे सोची विमानतळावर रशियाचे वरिष्ठ अधिकारी स्वागत करतील. यानंतर ते पुतीन यांच्यासोबत रिसॉर्टवर जाणार आहेत. सोची हे रशियाचे महत्त्वाचे शहर मानले जाते. चालू वर्षाच्या अखेरीस पुतीन देखील भारताचा दौरा करणार आहेत.

 

Related posts: