|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण अवलंबितांच्या लढय़ासाठी आजपासून गावागावांत बैठका

खाण अवलंबितांच्या लढय़ासाठी आजपासून गावागावांत बैठका 

प्रतिनिधी/ फोंडा

राज्यातील खाण उद्योग पूर्ववत सुरु होण्यासाठी राज्य सरकारच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे खाण अवलंबितांना आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. ‘गोवा मायनिंग पिपल्स प्रंट’च्या माध्यमातून या लढय़ाची पूर्वतयारी म्हणून आज बुधवार 23 मे पासून खाण पट्टय़ात जागृती मोहीम सुरु होणार आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष पूती गावकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

23 ते 30 मे दरम्यान खाण प्रश्नावर जागृती करण्यासाठी खाणपट्टय़ातील विविध भागात बैठका होणार असून त्याचे रुपांतर 1 जून रोजी पिळये धारबांदोडा येथे जाहीर सभेत होणार आहे. खाण व्यवसायावर अवलंबून असलेले ट्रकमालक, मशिनमालक, खाण कामगार व इतर अवलंबितांचे प्रतिनिधीत्व करणाऱया 50 सदस्यांचा या मंचमध्ये समावेश आहे.

गोवा खाणींची तुलना अन्य राज्यांशी नको

गोव्यात पोर्तुगीज काळापासून खाण उद्योग सुरु आहे. गोव्यातील खाण उद्योगाशी इतर राज्यांची तुलना करता येणार नाही, असे पुती गावकर म्हणाले. गोव्यातील खाणी या खासगी मालकीच्या असून 1987 मध्ये कन्सेशन प्रमाणे 2037 पर्यंत म्हणजे 50 वर्षे खाण उद्योग लीज पद्धतीनुसार सुरु राहायला पाहिजे. गोव्यातील खाण उद्योग बंद झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या साधारण दीड लाख लोकांना त्याचा थेट फटका बसलेला आहे.

सरकारकडून काहीच हालचाली नाहीत

अनेक कंपन्यांनी कामगार कपात केल्यामुळे बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य प्रकारे बाजू मांडण्याची गरज होती. मात्र मागील तीन महिने राज्य सरकारकडून कुठल्याच हालचाली होताना दिसत नाहीत. त्यासाठी आता जनजागृती व आंदोलन हाच पर्याय उरलेला आहे. गोवा मायनिंग पिपल्स प्रंटच्या माध्यमातून या आंदोलन कृतीला आजपासून सुरुवात होत आहे. खाण पट्टय़ातील विविध भागात होणाऱया या बैठकाना त्या त्या भागातील आमदार व खासदारांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती पूती गावकर यांनी यावेळी दिली.

खाणपट्टय़ातील आजपासूनच्या बैठकांचे वेळापत्रक

23 मे रोजी सकाळी 10.30 वा. पाळी, सुर्ला व वेळगे भागासाठी पाळी पंचायत सभागृहात बैठक होणार आहे.

24 रोजी सायं. 4 वा. होंडा, पिसुर्ले व साखळी भागासाठी सुंदरम सभागृह होंडा

25 रोजी सकाळी 10 वा. धारबांदोडा तालुक्यासाठी कळसई दाभाळ येथील श्री सातेरी पिसानी देवस्थान सभामंडप

26 रोजी सकाळी 10.30 वा. डिचोली, मये, शिरगांव व पिळगांव भागासाठी डिचोली पालिका सभागृह

27 रोजी सकाळी 10.30 वा. रिवण, सांगे व केपे भागांसाठी रिवण पंचायत सभागृह

28 रोजी सायं. 4 वा. उसगांव, गांजे येथे

29 रोजी सकाळी 10.30 वा. नावेली, आमोणा, कुडणे भागांसाठी पावलेश्वर सभागृह-नावेली.

30 रोजी सकाळी 10 वा. सावर्डे, काले, पंचवाडी या भागांसाठी तिस्क सावर्डे येथे.

1 जून रोजी सायं. 4 वा. पिळये धारबांदोडा येथील गोमंतक विद्यालयाच्या सभागृहात जाहीर सभा.

खाण कंपन्यांकडून 25 हजार कामगारकपात

खाण कामगार संघटनेचे देवानंद परब यांनी खाण बंदीनंतर विविध खाण कंपन्यांनी साधारण 25 हजार कामगारांना कामावरून कमी केल्याचे सांगितले. त्यामुळे हजारो कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

खाण प्रश्नावर सरकारने झोपेचे सेंग घेतले असून सरकारला जाग आणण्यासाठी सर्व खाण अवलंबिंतांनी संघटीतपणे लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन संदीप पाऊसकर यांनी केले. राज्य सरकार खाण प्रश्नाबाबत ध्रुतराष्ट्राची भूमिका घेत असल्याचा आरोप निळकंठ गांवस यांनी केला. राज्य सरकारने 31 मे पर्यंत या प्रश्नावर निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या गोवा भेटीदरम्यान खाणींचा प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातूनच सोडविला जाईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारवर विसंबून न राहता खाण अवलंबितांनाच आता आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रकाश गांवस, विनायक गांवस, रमेश सिनारी, देवानंद परब, लक्ष्मण देसाई, शिवदास माडकर, काशिनाथ नाईक, राम सावंत, संदीप परब, यशवंत बांदोडकर, शशिकांत गावकर, मायकल फर्नांडिस, कॅजेटीन फर्नांडिस, सुशांत परब, कामील फर्नांडिस आदी उपस्थित होते.

 

Related posts: