|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘शत-प्रतिशत’ विश्वास

‘शत-प्रतिशत’ विश्वास 

कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव जिंकला : 117 आमदारांचे ठरावाच्या बाजूने मतदान : भाजपचा सभात्याग

बेंगळूर / प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारने शुक्रवारी बहुमत सिद्ध केले आहे. येडियुराप्पा यांच्यासह भाजप आमदारांनी सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस-निजद आणि बसपच्या एकूण 117 आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. युतीचे एकही मत न फुटल्यामुळे कुमारस्वामींनी 111 हा जादुई आकडा लीलया पार करत ‘शत-प्रतिशत’ विश्वास संपादन केला.

भाजप नेते येडियुराप्पा विश्वासदर्शक चाचणीत अपयशी ठरल्यानंतर काँग्रेस आणि निजदने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. बुधवारी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला असून आता युतीची सत्ता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कर्नाटक विधानसभेत 104 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. पण बहुमतांसाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यामुळे येडियुराप्पा यांना अवघ्या अडीच दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

काँग्रेसचे रमेश कुमार विधानसभा अध्यक्ष

दरम्यान बहुमत सिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचे नाव पुढे करत निजद-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपने ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे अखेरीस काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रमेशकुमार यांचे नाव माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सूचविले. तसेच उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी यास अनुमोदन दिले. निवडीनंतर हंगामी सभापती बोपय्या, मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि विरोधी पक्षनेते बी. एस. येडियुराप्पा यांनी रमेशकुमार यांचे अभिनंदन केले. रमेशकुमार यांनी 1994 ते 1999 पर्यंत विधानसभेच्या सभापतीपदी कार्यरत होते. बहुमत चाचणी होण्यापूर्वी झालेली ही निवड निजद-काँग्रेससाठी लाभदायी ठरली.

खातेवाटपाची उत्सुकता

काँग्रेसचे 78 आणि निजदचे 37 आमदार आहेत. हे सर्व आमदार कुमारस्वामी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा सुरू होणार असून महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आता खातेवाटप आणि मंत्रिपदांचे सूत्र ठरविण्यासाठी चर्चा सुरू होणार आहे. अधिकाधिक खाती मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांकडून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील जनतेला खातेवाटपाची उत्सुकता लागली आहे.

आता कुमारस्वामींची कसरत सुरू

कुमारस्वामी यांनी 117 आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी बहुमत चाचणी अत्यंत महत्वाची होती. या ‘चाचणी’त ते यशस्वी ठरले असून आता त्यांना युतीचे सरकार टिकविण्याचे आणि राज्यातील जनतेची मने जिंकण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. काँग्रेस-निजदच्या वाटचालीत भाजपकडून अडचणी आणण्याचा प्रयत्न केला गेला तरीही लोकप्रिय आणि कल्याणकारी योजना राबवून त्यांना वाटचाल करावी लागेल.

 

Related posts: