|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » मनोरंजन » शिवकालीन शिलेदार चमकणार फर्जंदमध्ये

शिवकालीन शिलेदार चमकणार फर्जंदमध्ये 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं होतं. असंख्य मावळय़ांच्या शौर्याने, त्यागाने स्वराज्य स्थापन झाले. यापैकीच एक असलेल्या कोंडाजी फर्जंद या शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानांमधील आतापर्यंत समोर न आलेल्या अनेक लढवय्या व्यक्तिरेखा समोर येणार आहेत. स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपीची प्रस्तुती असलेला फर्जंद 1 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असून संदीप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार सहनिर्माते आहेत.

या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन करणाऱया दिग्पाल लांजेकर यांनी इतिहासाच्या पानांत लुप्त झालेल्या अनेक महान व्यक्तिरेखांना फर्जंद या सिनेमाद्वारे समोर आणण्याचं काम केलं आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि कोंडाजी फर्जंद या नायकाच्या भूमिकेत अंकित मोहनला सादर करताना इतर व्यक्तिरेखांसाठीही दिग्पालने दिग्गज कलाकारांची निवड केली आहे. या सिनेमात अभिनेता अजय पुरकर यांनी मोत्याजी मामा साकारले आहेत, तर आस्ताद काळे गुंडोजी बनलाय… राहुल मेहेंदळे अनाजी पंतांच्या भूमिकेत दिसणार असून, राजन भिसे हिरोजी इंदुलकर साकारत आहेत… हरीश दुधाडे यांनी गणोजीची व्यक्तिरेखा साकारली असून, प्रवीण तरडे यांनी मारत्या रामोशी ही महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. निखील राऊत यांनी खटय़ाळ खबऱया किसनाची भूमिका साकारली आहे. यासोबतच अंशुमन विचारेने भिकाजीच्या भूमिकेत रंग भरला आहे. या सर्व व्यक्तिरेखा प्रभावीपणे पडद्यावर सादर व्हाव्यात या उद्देशाने दिग्पालने मराठीतील आघाडीच्या कलाकारांची निवड केली आहे.

याबाबत बोलताना दिग्पाल म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अनेक शिलेदारांचं मोलाचं योगदान आहे. मोत्याजी मामा, गुंडोजी, अनाजी पंत, हिरोजी इंदुलकर, गणोजी, मारत्या रामोशी, भिकाजी यांचाही त्यात समावेश आहे. फर्जंद या सिनेमात कोंडाजी फर्जंद याची कथा असली तरी कोंडाजीप्रमाणेच स्वराज्याच्या जडणघडणीत सहभागी असलेल्या तत्कालीन नायकांचं कार्य समोर यावं या उद्देशाने त्यांच्यावर फोकस केला आहे. यांच्या भूमिका फार मोठय़ा नसल्या तरी त्या प्रभावीपणे मनावर ठसतील याची दक्षता घेण्यात आल्याचंही दिग्पाल म्हणाला. नितीन चंद्रकांत देसाई यांनी चित्रपटाचे कलादिग्दर्शन केलं आहे, तर निखील लांजेकर यांनी ध्वनीलेखनाचं काम पाहिलं आहे. 1 जून रोजी फर्जंद रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

Related posts: