|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयांच्या जमिनीचे पैसे एकाने लाटल्याने खळबळ

शेतकऱयांच्या जमिनीचे पैसे एकाने लाटल्याने खळबळ 

प्रतिनिधी/ बेळगाव

किणये येथे बांधण्यात आलेल्या जलाशयामध्ये अनेक शेतकऱयांची जमीन गेली आहे. नारायण भरमाण्णा पाटील आणि त्यांच्या इतर भावांची जमीन त्या जलाशयामध्ये गेली आहे. त्याची नुकसानभरपाई सरकारकडून मंजूर झाली. मात्र ती नुकसानभरपाई एकाने परस्पर लाटली असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जमीन मालकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

किणये येथे नवीन जलाशयाची उभारणी करण्यात आली आहे. या जलाशयात नारायण पाटील, मयत भुतेप्पा पाटील, मयत यशवंत पाटील यांच्यासह इतरांची जमीन त्या जलाशयामध्ये गेली आहे. सर्व्हे क्रमांक 212 मधील आणि 189/8,188/12,188/5,213/4 यासह इतर सर्व्हे क्रमांकांची जमीन गेली आहे. त्या जमिनीची नुकसानभरपाई या सर्व शेतकऱयांना मंजूर झाली होती. मात्र, अर्जुन महादेव पाटील यांनी ती रक्कम बनावट स्वाक्षऱया तसेच अनेकांना फसवून स्वाक्षऱया घेऊन लाटल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणामध्ये बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांचा, बँक कर्मचाऱयांचा आणि वकिलांचा समावेश आहे. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या सर्व शेतकऱयांची नुकसानभरपाईची रक्कम सव्वाकोटी रुपये आहे. ही रक्कम मिळाली नाही म्हणून अनेकांना धक्का बसला असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे किणये परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या गरीब शेतकऱयांना मंजूर झालेली रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी शांताराम पाटील, संजय पाटील, सुभाष पाटील, गणपती पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.