|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आप-काँग्रेस आघाडीची शक्यता

आप-काँग्रेस आघाडीची शक्यता 

आगामी निवडणुकीसाठी एकत्र येणार : जागावाटप ठरणार महत्त्वाचे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

 2019 लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबद्दल आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ‘आप’ने काँग्रेससमोर जागावाटपाचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. परंतु काँग्रेस नेते अजय माकन यांनी दोन दिवसांत दोनदा याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. तर आप नेत्या अलका लांबा यांनी काँग्रेससोबत आघाडीबद्दल चर्चा झाल्याचे संकेत दिले
आहेत.

24 मे रोजी काँग्रेस आणि आप नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली होती. आपने काँग्रेसला दिल्लीतील 7 पैकी 2 जागा देण्याचा प्रस्ताव मांडला, परंतु काँग्रेसने 3 जागांची मागणी केल्याने चर्चा या मुद्यावर अडकून पडली. नवी दिल्ली मतदारसंघातून शर्मिष्ठा मुखजी, चांदनी चौकमधून अजय माकन आणि उत्तर-पश्चिम दिल्ली मतदारसंघातून राजकुमार चौहान यांना उमेदवारी देण्याची काँग्रेसची इच्छा आहे.

केजरीवालांकडून मनमोहनांचे कौतुक

अलिकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे जाहीरपणे कौतुक केले होते. त्यांच्या कौतुकवाणीमुळे काँग्रेस आणि आपमधील आघाडीच्या चर्चेला बळ मिळाले आहे. 2013 मध्ये मनमोहन सिंग यांना भ्रष्टाचारी ठरविणाऱया केजरीवालांच्या भूमिकेत झालेला हा बदल आश्चर्यकारक मानला जातोय.

दिल्लीत 5 प्रभारी नियुक्त

आपने दिल्लीच्या 7 लोकसभा मतदारसंघांपैकी 5 ठिकाणी प्रभारी नियुक्त केले आहेत. याच मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित केले जातील असे मानले जातेय. नवी दिल्ली आणि पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तयारी यातून आपने दाखविल्याची चर्चा रंगली आहे.

आघाडीबद्दल कोण काय म्हणाले?

जनतेने आम आदमी पक्षाला नाकारले असल्याने आम्ही त्यांच्यासोबत का जाऊ? केजरीवाल संघसमर्थित टीम अण्णाचे सदस्य आहेत. मोदींना राक्षस होण्यास त्यांनीच मदत केल्याचा दावा दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी केला. अजय माकन यांनी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आम आदमी पक्षाच्या संपर्कात असल्याचे जाणून घ्यावे. काँग्रेस हरियाणा, दिल्ली आणि पंजाबमध्ये आघाडी इच्छित असल्याचे आप नेते दिलीप पांडे यांनी म्हटले.