|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दिलीप माने यांच्यासह 17 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

दिलीप माने यांच्यासह 17 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर 

 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 39 कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपावरुन फौजदारी गुन्हा दाखल झालेले समितीचे तत्कालीन सभापती दिलीप माने यांच्यासह 17 जणांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. आज बुधवारी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी हा निकाल दिला.

सदर अर्जावर सरकारी वकीलांनी त्यांचे म्हणणे मांडून पाच दिवसांची मुदत मागितली. त्यास दिलीप माने यांचे ऍड. धनंजय माने यांनी जोरदार हरकत घेतली. केवळ प्रकरण लांबवण्यासाठी व निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरोपींना अंतरिम जामीन मिळू नये यासाठी मुदतीचा अर्ज दाखल केलेला आहे. ऍड. माने यांनी अटकपूर्व जामीनच्या तरतुदीबद्दल लॉ कमिशनच्या 41 व्या अहवालाचा आधार घेऊन युक्तीवाद केला. राजकीय विरोधकांना खोटय़ा खटल्यात गुंतवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. आरोपी जर फरार होणारा नसला व जामीनाचा दुरूपयोग करणारा नसला तर त्यास तू पोलिसांसमोर हजर हो, काही दिवस कारागृहात राहा आणि त्यानंतर जामिनासाठी अर्ज कर, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खोटा खटला दाखल केला आहे, असा युक्तीवाद केला. सदर युक्तीवाद ग्राह्य धरुन 17 जणांना 11 जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या खटल्यात ऍड. धनंजय माने, ऍड. जयदीप माने, ऍड. श्रीहरी कुरापाटी, ऍड. विकास मोटे, ऍड. शशी कुलकणी, ऍड. प्रशांत नवगिरे आणि ऍड. भारत कट्टे यांनी आरोपीतर्फे तर सरकातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी काम पाहिले.

Related posts: