|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काँग्रेसच्या बाहुबलींना कालचक्राचा दणका

काँग्रेसच्या बाहुबलींना कालचक्राचा दणका 

आता कुमारस्वामी थेट राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याला ते महत्त्व देत नाहीत. याचीही सल कर्नाटकातील नेत्यांच्या मनामध्ये आहेच. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही सर्व खदखद उफाळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून पुढचा मुख्यमंत्री मीच, कर्नाटकातील पक्षाचा नेता आपणच असे नेटाने आणि थाटाने सांगणाऱया सिद्धरामय्या यांना बाजूला सारले गेले आहे, हेच खरे आहे. कारण कालचक्र फिरतच राहणार आहे.

 

कालचक्राच्या ओघात कोणाची वाताहत होते तर अडगळीत असलेले अचानक प्रकाशझोतात येतात. केवळ त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम आपल्या अंगी असावा लागतो. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे समर्थक नेते सध्या कालौघाच्या चक्रात सापडले आहेत. अनेक मातब्बर नेत्यांची पुरती वाट लागली आहे. दस्तुरखुद्द सिद्धरामय्या राजकीय प्रवाहातून बाजूला फेकले गेले आहेत की काय, असे वाटू लागले आहे. आजवर कर्नाटकात काँग्रेसचा सर्वेसर्वा अशीच त्यांची ओळख होती. 15 मे 2018 च्या निवडणूक निकालाने सिद्धरामय्या यांची ही ओळख बदलली आहे. बदलती राजकीय परिस्थिती, काँग्रेस-निजद युतीमधील तिढा, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर कर्नाटकातील युती टिकविण्याची निर्माण झालेली गरज, त्यासाठी कितीही पडते घेण्याची काँग्रेस नेत्यांनी दर्शविलेली तयारी आदी कारणांमुळे सिद्धरामय्यांची कर्नाटकाच्या राजकारणात पदावनती होताना दिसत आहे.

गेली पाच वर्षे सिद्धरामय्या यांच्या राजवटीत बाजूला फेकले गेलेले प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डॉ. जी. परमेश्वर यांचे नशीब फळफळले आहे. गेल्या निवडणुकीत परमेश्वर यांचा पराभव कसा करता येईल, याचा विचार स्वकियांनीच केला. या प्रयत्नात त्यांना यशही आले. अल्पावधीसाठी त्यांना मंत्रिपद देऊन नंतर केवळ पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परमेश्वर यांना बाजूला सारण्याची एकही संधी सिद्धरामय्या आणि त्यांच्या समर्थकांनी सोडली नाही. आता नेमके सिद्धरामय्यांच्याबाबतीत तेच घडत आहे. त्यांनी आधी जे केले आता त्याच मार्गावरून त्यांनाही मार्गक्रमण करावे लागत आहे. बुधवारी काँग्रेस-निजद युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये सिद्धरामय्या समर्थकांच्या पदरी घोर निराशा आली आहे. डॉ. जी. परमेश्वर, मल्लिकार्जुन खर्गे समर्थकांना झुकते माप देऊन सिद्धू समर्थकांना मात्र हायकमांडने आवर घातला आहे. याचा परिणाम म्हणून काँग्रेसमध्ये बंडाळी झाली आहे. सुमारे 17 हून अधिक असंतुष्ट आमदारांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यापैकी अनेकांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस आणि निजदमधील पक्षांतर्गत बंडाळी उफाळली आहे.

माजी मंत्री शामनूर शिवशंकरप्पा, एच. के. पाटील, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी, आर. रोशन बेग, एस. आर. पाटील, तन्वीर सेठ आदींसह अनेक नेत्यांचे मंत्रिपद हुकले आहे. निजदचे ज्ये÷ नेते व विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनाही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे साहजिकच गेले दोन दिवस त्यांच्या समर्थकांनी पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले आहे. काँग्रेस नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. बुधवारी काँग्रेसचे 15 व निजदचे 10 असे एकूण 25 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अनेक नेत्यांची नावे मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत मंत्रिपदाच्या यादीत होती. बुधवार उजाडताच ही नावे यादीतून गायब झाली. हा चमत्कार नेमका कशामुळे झाला? याचे उत्तर शोधण्यात मंत्रिपद हुकलेले नेते मग्न आहेत. विधानसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेसने वीरशैव-लिंगायत वाद उफाळेल याची काळजी घेतली होती. त्याचा चांगलाच फटका काँग्रेसला निवडणुकीत बसला. आता मंत्रिमंडळ विस्तारात वीरशैव-लिंगायत वादातील नेत्यांना बाजूला ठेवून आम्ही तटस्थ आहोत, असे भासविण्यात येत आहे.

विधानसभा निवडणूक निकालाने भल्याभल्या नेत्यांना अद्दल घडविली आहे. भाजपला अगदी सत्तेच्या जवळ नेऊन केवळ पाच-सहा जागांसाठी सत्तेपासून दूर रहावे लागले. सिद्धरामय्या सरकारने विधिमंडळात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक संमत केले होते. सध्या कुमारस्वामी आणि डॉ. जी. परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील युतीची सत्ता आहे. मंत्रिपदाची शपथ कोणत्या मुहूर्तावर घ्यावी, राहू काल संपल्यावरच आपल्या कार्यालयात कसा प्रवेश करावा, पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी कोणता मुहूर्त शुभदायी आहे, शत्रूसंहार होमामुळे राजकीय शत्रूंचा नाश कसा करता येईल असे प्रत्येक कामासाठी बुवा आणि ज्योतिषांचा सल्ला घेणारे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मुख्यमंत्री कुमारस्वामी व त्यांचे बंधू एच. डी. रेवण्णा यांच्याबरोबर जमवून घेण्याची वेळ काँग्रेसवर येऊन ठेपली आहे. युतीच्या राजवटीत सध्या काँग्रेसचे शक्तीकेंद्र बदलले आहे. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर व त्यांच्या समर्थकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. सिद्धरामय्या आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दणका देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच सिद्धू समर्थकांचा असंतोष उफाळला आहे. भविष्यात याचाही फटका पक्षाला बसणार आहे.

कर्नाटकातील या सर्व घडामोडींची कल्पना राहुल गांधी यांना आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकातील सत्ता भाजपला द्यायची नाही, या एकाच उद्देशाने देवेगौडा व कुमारस्वामी म्हणतील त्याला होकार देत त्यांना पाठिंबा दिला आहे. पुढची पाच वर्षे कुमारस्वामी हेच मुख्यमंत्री असतील, असे कर्नाटकातील काँग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केले आहे. यासंबंधीची महत्त्वाची घोषणा करताना राहुल गांधी किंवा वेणुगोपाल यांनी कर्नाटकातील नेत्यांबरोबर साधी चर्चाही केली नाही, याचाही धक्का कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांना बसला आहे. आता कुमारस्वामी थेट राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याला ते महत्त्व देत नाहीत. याचीही सल कर्नाटकातील नेत्यांच्या मनामध्ये आहेच. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही सर्व खदखद उफाळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून पुढचा मुख्यमंत्री मीच, कर्नाटकातील पक्षाचा नेता आपणच असे नेटाने आणि थाटाने सांगणाऱया सिद्धरामय्या यांना बाजूला सारले गेले आहे, हेच खरे आहे. कारण कालचक्र फिरतच राहणार आहे. त्याखाली कोण अडकणार, कोण तरणार हे येणारा काळच ठरवणार!

Related posts: