|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात एसटी संपाला हिंसक वळण

जिल्हय़ात एसटी संपाला हिंसक वळण 

चिपळूण, दापोलीत शिवशाहीवर दगडफेक

गुहागरात विठ्ठलवाडी बसला दणका

संपकरी कर्मचाऱयाचे कृत्य, गुन्हा दाखल,

कर्मचाऱयास अधिकाऱयाकडून मारहाण झाल्याने कामगार संतप्त

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

वेतनवाढीसह विविध मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱयांनी पुकारलेला अघोषित संपाला शनिवारी दुसऱया दिवशी हिंसक वळण लागले. चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट व दापोलीत दोन शिवशाही बसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. तर गुहागरमध्येही विठ्ठलवाडीकडे जाणाऱया बसला घेराव घालत ती पुन्हा आगारात आणण्यात आली. आक्रमक एसटी कर्मचाऱयांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कुंभार्ली घाटात दगडफेक करणाऱया एस. टी. कर्मचाऱयाला अधिकाऱयांकडून मारहाण झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

एस. टी. चालक-वाहकांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून कोणतीही सूचना न देता अचानकपणे बेमुदत संप पुकारला. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांचे निलंबन करण्याची नोटीस प्रत्येक डेपोत लावण्यात आली असली तरी कर्मचाऱयांनी त्याकडे दुर्लक्ष करत संप सुरूच ठेवला. गुहागर व मंडणगडमध्ये संपाला 100 टक्के प्रतिसाद मिळाला असून अन्य ठिकाणी काही गाडय़ा शनिवारी सुरू झाल्या. दरम्यान, दुसऱया दिवशी तब्बल 1537 फेऱया बंद असल्याने विभागाला 1 कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे.

कुंभार्ली घाटात कर्मचाऱयांकडून दगडफेक

शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास चिपळूण-पुणे शिवशाही बस कुंभार्ली घाटात अडवून चिपळूण आगाराचा कर्मचारी नितिन संपत कारंडे व अन्य एकाने बसच्या दर्शनी काचेवर दगडफेक करून काचा फोडल्या. बस चालक आबासाहेब अंकुश तळेकर याने या कर्मचाऱयाला पकडून आगारात माहिती देताच अधिकाऱयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी दगडफेक करणाऱया कारंडे याला अधिकाऱयांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार कर्मचारी संघटनानी केली आहे. जबर जखमी झालेल्या कारंडे याला कामथे रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर कर्मचारी संघटनांनी एकत्रीतरित्या अधिकाऱयांच्या विरोधात पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान कारंडे याच्यावर दगडफेक व बसचे नुकसान केल्याप्रकरणी भादंवि कलम 336, 427 व 34 अन्वये शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

अधिकाऱयांवर करावी व्हावी- राज तटकरे

दडगफेकीनंतर सदर कर्मचाऱयाला कायदा हातात घेऊन मारहाण करणाऱया अधिकाऱयांचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर करण्याची मागणी कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष राज तटकरे यांनी केली. संपकाळात घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱयांचा उद्रेक झाल्यास अधिकारी व प्रशासनच त्याला जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला.

दापोलीतही ‘शिवशाही’वर दगडफेक

दापोलीहून मुंबईकडे जाणाऱया शिवशाही गाडीवर पिसईनजिक शनिवारी दगडफेक करण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नसले तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दगडफेकीत शिवशाहीच्या मागील काचा फुटून नुकसान झाले. यानंतर ही गाडी पंचनामा करून पुन्हा दापोलीकडे वळवण्यात आली व दापोली आगारात उभी करून ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱया गाडय़ा तूर्तास स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र पर्यायी शिवशाही गाडीची व्यवस्था करण्यात आल्याने 45 प्रवासी मुंबईकडे मार्गस्थ झाले. शिवसेना प्रणित कामगार सेना संपात सहभागी नसल्याने काही गाडय़ा सुरू आहेत.

गुहागरात विठ्ठलवाडी बसला कर्मचाऱयांचा दणका

गुहागरमध्ये आगाराबाहेर बस उभी करणाऱया चालक-वाहकांना अन्य कर्मचाऱयांनी चांगलाच दणका दिला. संपात फूट पाडण्याबाबत जाब विचारत संपकरी कर्मचाऱयांनी प्रवासी भरणाऱया गुहागर-विठ्ठलवाडी एस. टी. बसला घेराव घालत ती पुन्हा आगारात आणण्यास भाग पाडले. शनिवारी विठ्ठलवाडीकडे जाणारी बस आगारामध्ये न आणता याच पंचायत समिती गोडावूनजवळ लावण्यात आली होती. त्यामुळे संपकऱयांनी चालक-वाहकांना धारेवर धरत ती आगारात लावून ठेवण्यात भाग पाडले.

91 कर्मचाऱयांवर कारवाई

अचानक पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी प्रवाशांबरोबरच प्रशासनाचीही तारांबळ उडाली. संपातील 91 कर्मचाऱयांवर एस.टी. प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली असून अन्य कर्मचाऱयांवरही कारवाईचा बडगा उचलण्यात येईल अशी माहिती एस. टी. यंत्र चालन अभियंता विजयकुमार दिवटे यांनी दिली. शनिवार असल्याने कारवाईबाबतचे आदेश वरीष्ठ स्तरावरून प्राप्त झालेले नसल्याचे समजते.

रत्नागिरीत शनिवारी आठवडा बाजारामुळे मोठी गर्दी असते मात्र शनिवारी बहुतांश नागरिक बाहेर पडलेच नाही त्यामुळे बसस्थानकात गर्दी कमी होती. मात्र आरटीओ कार्यालयाकडून बसस्थानकात 20 ते 30 खाजगी गाडय़ांची सोय करण्यात आली होती यासाठी स्वतः वाहन निरीक्षक जातीनिशी याठिकाणी उपस्थित होते. लांजा डेपो मात्र संपाला अपवाद ठरला असून शनिवारी 115 गाडय़ा सुटल्या. याठिकाणी सेनाप्रणीत संघटनेचे बहुसंख्य कर्मचारी असल्याने वाहतूकीत कोणताही अडथळा आला नसल्याचे समजते.

खासगी वाहनधारकांचे स्तुत्य पाऊल

प्रवाशांची लूट करत असल्याच्या टीकेचा सामना नेहमीच झेलणाऱया खासगी वाहनचालकांनी या संपात मात्र प्रशासनाला सहकार्य करत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. एस. टी. तिकीटाच्या दिडपट भाडे आकारण्याची परवानगी असतानाही हे वाहनचालक एस.टीच्याच दरात प्रवासी वाहतूक करत असल्याने कौतुक होत आहे. शनिवारी रत्नागिरी तालुक्यातून कमी गाडय़ा सुटल्याने खासगी गाडय़ांची संख्या सुमारे दुपटीने वाढवण्यात आली असून 40-50 खाजगी वाहने तैनात ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांच्या अडचणीत खाजगी वाहनधारकांनी दिलेला आधार खूप महत्वाचा असून त्यामुळे 24 तासात कोणतीही गैरसोय झाली नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

विभागाला 1 कोटींचा फटका

सलग दुसऱया दिवशीच्या संपामुळे एस.टी.चे एकूण 1 कोटीचे आर्थिक नुकसान झाले असून 91 कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागात एकूण 4 हजार 113 चालक-वाहक असून यातील 266 कर्मचारी आठवडाभराच्या सुट्टीवर आहेत तर उर्वरीत कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. मात्र शनिवारी महामंडळाकडून कोणतेच कारवाईचे आदेश नसल्याने उर्वरीत कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आलेली नाही मात्र आदेश येताच ही कारवाई केली जाईल अशी माहिती वाहतूक अधिकाऱयांकडून देण्यात आली.

Related posts: