|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » प्रकाशकांनी बालसाहित्याला बळ द्यावे – ल. म. कडू यांचे आवाहन

प्रकाशकांनी बालसाहित्याला बळ द्यावे – ल. म. कडू यांचे आवाहन 

 पुणे / प्रतिनिधी :

बालसाहित्यिक लिहिते आहेत. राजीव तांबे यांच्याकडेही बाल वाचकांसाठी चार पुस्तके लिहून तयार आहेत. मात्र, त्यांना प्रकाशक मिळत नाहीत. वाचक टिकवायचे असतील, तर प्रकाशकांनी बालसाहित्याला बळ देण्याची गरज आहे. त्यामुळे प्रकाशकांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर बालसाहित्य प्रकाशित करावे, असे आवाहन बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ल. म. कडू यांनी येथे केले.

पुणे मराठी ग्रंथालयाच्या ‘प्रगती पुस्तक’ नावाच्या चित्रफितीच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कार्याध्यक्ष धनंजय बर्वे व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रकाशनादरम्यान ‘प्रगती पुस्तक’ ही चित्रफित दाखविण्यात आली. रसिकांनी टाळ्या वाजवून चित्रफितीला दाद दिली. तांबे यांनीही चित्रफितीचे कौतूक केले. त्याचबरोबर आजचे बालसाहित्यिक डोस देण्यास बसल्यासारखे वाटतात, असा उपरोधिक टोलाही लगावला. चित्रफितीची संकल्पना ग्रंथपाल संजिवनी काकडे यांची, तर दिग्दर्शन श्रीनिवास फडके यांचे आहे. रवी फडके यांच्या निवासस्थानी चित्रीत झालेल्या या चित्रफितीमध्ये बालकलाकार सानिया भंडारे, तसेच स्वाती कुलकर्णी, संजय भंडारे, सुधीर इनामदार यांच्या भूमिका आहेत. चित्रफितीला सहकार्य करणाऱया स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच ऋचा आठवले, वैजयंती गोडबोले, कलाकारांतर्फे सानिया भंडारे, दिग्दर्शक श्रीनिवास फडके यांचाही सन्मान करण्यात आला. राज्य ग्रंथालय संचालक क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती.