|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात दूषित पाणीपुरवठा

शहरात दूषित पाणीपुरवठा 

प्रतिनिधी/ बेळगाव

राकसकोप जलाशयामध्ये मागील वर्षीपेक्षा पाण्याची पातळी चार फुटाने जास्त असल्याने पाणीपुरवठा सुरळीत आहे. मात्र शहर आणि उपनगरांमधील नळांना  दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाला प्रारंभ झाला आहे. राकसकोप जलाशयातील  पाणीही गढूळ आहे. शहरातील अनेक ठिकाणी नळांना गढूळ पाणी येण्यास प्रारंभ झाला आहे. याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार केली असता. याची दखल अधिकारी घेत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  जलशुद्धीकरणासाठी पाणीपुरवठा मंडळ मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करते. पण शहरातील अनेक ठिकाणी नळांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.

राकसकोप जलाशयामधील पाणी पावसामुळे दूषित झाले असल्याचे पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. पण हिडकल जलाशयामधून पाणीपुरवठा करण्यात येऊनही पाणी दूषित कसे असा मुद्दा उपस्थित झाला आहे. शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, समर्थनगरसह शहरातील विविध भागात नळांना गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून करण्यात  येत आहे.  शुद्धीकरण करण्यात आलेल्या पाण्याला ब्लिचिंग पावडरचा थोडय़ा प्रमाणात वास येतो. पण पाणी गढूळ येत असून पाण्याला दुर्गंधीही येत आहे. राकसकोप जलाशयामधून येणारे पाणी शुद्धीकरण न करता थेट पुरवठा करण्यात येत आहे का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

 शहरात विविध रोगराईचा फैलाव होत असताना पाणीपुरवठा मंडळाने दूषित पाण्याचा पुरवठा चालविला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही याची दखल घेण्यात येत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.