|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दहावी पुरवणी परीक्षेला प्रारंभ

दहावी पुरवणी परीक्षेला प्रारंभ 

प्रतिनिधी /बेळगाव :

दहावीच्या पुरवणी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. मार्च-एप्रिल 2018 च्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून एक संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येत असून 21 ते 28 जून दरम्यान परीक्षा होणार आहे. सकाळी 9.30 वा. गणित विषयाच्या पेपरने परीक्षेला सुरुवात झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पेपर सुरळीत पार पडला. यामुळे चिंता, हुरहुर असणाऱया गणित विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पेपर संपताच सुटकेचा नि:श्वास सोडला.

गुरुवारी झालेल्या गणित विषयाच्या पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, खानापूर, कित्तूर, रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्मयातील 3 हजार 230 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. यापैकी 3 हजार 54 विद्यार्थी हजर होते. तर 176 विद्यार्थी गैरहजर राहिले. यामध्ये 96 मुले आणि 80 मुलींचा समावेश आहे.

शहरातील विविध केंद्रांवर सकाळी 9 पासूनच गर्दी दिसून आली. पालक आपल्या पाल्यांसोबत परीक्षा केंद्रांवर येताना दिसत होते. यामुळे परीक्षेच्या दरम्यान परीक्षा केंद्रांबाहेर पालकांची उपस्थिती दिसून आली.

बेळगाव शहरात 6 तर ग्रामीण भागात 2 केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सिटींग स्क्वॉड, मायक्रो परीक्षक, चोख पोलीस व्यवस्था, तसेच शालेय सिक्मयुरीटीच्या माध्यमातून परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर पहिला पेपर सुरळीतपणे पार पडला. रुट ऑफिसरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका वितरण तसेच पेपर होताच उत्तरपत्रिका सील करून खात्याकडे देण्यात आल्या.

Related posts: