|Sunday, December 8, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जैसें न चालतां सूर्याचें चालणें

जैसें न चालतां सूर्याचें चालणें 

नैष्कर्म्य स्थितीत राहणाऱया दुर्वासांसारख्या सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात-

सिद्ध पुरुष व्यवहारातील कर्म बिनचूक करतो. इतकंच नव्हे, तर त्याच्याइतका कामाचा उरक इतर व्यावहारिक माणसांना नसतो.

क्रियाकलापू आघवा । आचरतु दिसे बरवा ।।

अशा चिन्हांनी युक्त माणूस ज्ञानी आहे असे समजावे. आपलं प्रकृतीपासून असणारं वेगळेपण तो ओळखतो. सामान्य माणूस देहाशी तादात्म्य पावून, देह म्हणजे मी या भ्रमात असतो. तो तसा नाही. मी देह नाही, हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव असतो.

आळशी माणूस कामच करीत नाही किंवा झोपलेला माणूस झोपेचा वेळ कर्म करीत नाही. ही नैष्कर्म्य स्थिती नव्हे. कुंभकर्ण महिना नि महिना झोपलेला राही. त्यामुळे त्या वेळी तो कोणतंच कर्म करीत नसे. ही काही नैष्कर्म्य स्थिती नव्हे. कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्य नव्हे. कर्मात आपण नसणं ही नैष्कर्म्य स्थिती आहे. एखादा मनुष्य तळय़ाकाठी उभा आहे आणि त्याला त्याचंच स्वरूप पाण्यामध्ये दिसतं आहे. स्वतःला पाण्यात पाहूनही-तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहे ।। प्रतिबिंब मी नाही. मी वेगळा आहे हे तो जाणतो, त्याला भ्रांती नसते. यापुढे ज्ञानेश्वर माउली एकाहून एक सरस दृष्टांत देतात. माउलींचे सूक्ष्म निरीक्षणही यातून प्रतीत होते.

अथवा नावें हन जो रिगे ।  तो थडियेचें रुख जातां देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे ।  तंव रुख म्हणे अचळ  ।।

तैसें सर्व कर्मीं असणें । ते फुडें मानूनि वायाणें ।

मग आपणया जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा  

आपण एखाद्या होडीतून जाऊ लागलो तर काठावरील वृक्ष मागे पळताना दिसतात; (आधुनिक काळात हा अनुभव आपल्याला बस किंवा रेल्वेतून प्रवास करतानाही येतो.) पण ते खरोखरचे पळत असतात का? ते तर अचलच असतात. या दोन्ही उदाहरणांतून माउलींना असं दाखवून द्यायचं आहे की दोन्ही ठिकाणी दृष्टीभ्रम नांदत आहे. जे दिसतं ते सत्यत्वानं नसतं. जरी झाडं मागे धावताना दिसत असली तरी ते दिसणं खरं नाही. त्याप्रमाणे प्रत्यक्ष सर्व कर्म करीत असतानाही खऱया अर्थानं हे सर्व भ्रमात्मक आहे हे जाणून स्वतःच निर्लेपत्व, नैष्कर्म्यत्व साधूच्या अनुभवास येतं. आत्मस्वरूपाला कोणतंही कर्म चिकटत नाही, तो काही करीत नाही, करवीतही नाही. असं देहापासून आत्मस्वरूपांचं वेगळेपण त्याच्या प्रत्ययाला आलेलं असतं. सर्व कर्मे यथासांग करूनही हे सर्व प्रकृतीचं कर्तृत्व आहे, हा वरवरचा देखावा आहे असे तो जाणतो आणि स्वतः अकर्ता राहातो.

आणि उदो‌अस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ।

ज्ञानेश्वर माउलींनी इथं एक सुंदर दृष्टांत दिला आहे की त्यामुळे आपणांस नैष्कर्म्य स्थितीची कल्पना तर यावीच, पण एक विज्ञानामधील सत्यही कळावं. केवळ सोळा वर्षाच्या वयाच्या ज्ञानदेवांनी सुमारे सातशे पंचवीस वर्षांपूर्वी हे सांगितले आहे हे विशेष.

ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: